दारू अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र सुरूच
By admin | Published: June 25, 2015 01:30 AM2015-06-25T01:30:09+5:302015-06-25T01:30:09+5:30
गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने भिवंडी तालुका पोलिसांबरोबर केवणी दिवे गावातील दारू अड्ड्यांवर संयुक्तपणे धाडसत्र राबविले
काल्हेर/ठाणे : गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने भिवंडी तालुका पोलिसांबरोबर केवणी दिवे गावातील दारू अड्ड्यांवर संयुक्तपणे धाडसत्र राबविले. या धाडीत गावठी दारूसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कापूरबावडी पोलिसांनीही मानपाडा भागातून बेकायदेशीर दारू जप्त केली. दोन महिलांसह पाच जणांवर याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे तसेच भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व्ही.एस. शिरसाठ यांच्या पथकाने २३ जूनला धाड टाकली. लक्ष्मी भोईर, रंजू भोईर व मोरेश्वर भोईर यांच्या घरातून हौसा पाटीलने गावठी दारू बनविण्यासाठी लागणारी सामग्री जमा केली होती. या अड्ड्यावरून व घरातून २५ लीटरचे २७ कॅन आणि १८ हजार ९०० ची १४५ लीटर गावठी दारू, ६० हजारांचा गूळ व साखर ३० किलोंच्या २०० गोण्यांमधून जप्त केली. तसेच, एक लाख १२ हजार ५०० रुपयांचा गूळ, साखरमिश्रित कच्चा माल तसेच निळ्या रंगाचे आठ कॅन असा तीन लाख २९ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी मोरेश्वरने अटकपूर्व जामीन घेतला असून हौसाला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.