मुंडे प्रकरणातील तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदविला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 03:22 AM2021-01-17T03:22:39+5:302021-01-17T07:11:29+5:30
या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त जोत्स्ना रासम यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. सुमारे साडेपाच तास तिच्याकडे चौकशी करण्यात आली.
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या तरुणीचा शनिवारी पोलिसांनी सविस्तर जबाब नोंदवून घेतला. पश्चिम उपनगरातील डी. एन.नगर सहायक पोलीस आयुक्तांकडे हा जबाब घेण्यात आला. आवश्यकता वाटल्यास तिला पुन्हा बाेलावण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त जोत्स्ना रासम यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. सुमारे साडेपाच तास तिच्याकडे चौकशी करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी आपला व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध स्थापित केले, त्याबाबत आपण बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुंडे यांनी दबाव टाकून दिशाभूल केल्याचे तरुणीने पाेलिसांना सांगितल्याचे समजते.
हेगडे, धुरी हे धनंजय मुंडे यांचे मित्र - तरुणीचा आराेप
माझ्यावर खोटे आरोप करणारे कृष्णा हेगडे, मनीष धुरी हे धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत. माझ्यावर आरोप करून त्यांना मदत करीत आहेत, असा आरोप तरुणीने केला.
पत्रकारांशी संवाद साधताना तिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांचा मी आदर करते. ते माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतात हे मला माहीत नाही. मनसेचे नेते मनीष धुरी यांना मी माझ्या अडकलेल्या अल्बमसंदर्भात भेटले होते. त्यानंतर ते मला दारू पिऊन कॉल रायचे, असा आरोप तरुणीने केला. दरम्यान, हेगडे यांच्याप्रमाणेच धुरी यांनी हे आराेप फेटाळून लावले.
मुंडेंशी माझा फारसा परिचय नाही - कृष्णा हेगडे
- मुंबई : धनंजय मुंडे यांना मी सहा, सात वर्षांपूर्वी केवळ एकदाच भेटलो हाेताे. ते माझे मित्र नाहीत की त्यांच्याशी माझा फारसा परिचयही नाही, त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही, असे भाजपचे नेते व माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शनिवारी स्पष्ट केले.
- त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार दिलेल्या तरुणीने आपल्यालाही मेसेज पाठवून अडकविण्याचा प्रयत्न केला होता, ही वस्तुस्थिती सर्वांसमोर यावी, पोलिसांनी सर्व बाजूंनी सखोल चौकशी करावी, यासाठी मी स्वतःहून तक्रार दिली आहे. हे राज्यातील पहिले राजकीय ‘मी टू’ प्रकरण असल्याचा दावा त्यांनी केला.