पोलीस शिपायाने नाकारले ६८ रुपयांचे मानधन
By admin | Published: January 8, 2015 01:18 AM2015-01-08T01:18:17+5:302015-01-08T01:18:17+5:30
पोलिसांच्या वेतन व मानधनातील भेदभावाचा मुद्दा तापला आहे. एका पोलीस शिपायाने साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात मिळणारे अवघे ६८ रुपयांचे मानधन थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून नाकारले आहे.
सुटीच्या मोबदल्यातील भेदभाव : थेट महासंचालकांनाच पत्र
राजेश निस्ताने - यवतमाळ
पोलिसांच्या वेतन व मानधनातील भेदभावाचा मुद्दा तापला आहे. एका पोलीस शिपायाने साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात मिळणारे अवघे ६८ रुपयांचे मानधन थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून नाकारले आहे. एवढेच नव्हे, तर हे मानधन सरकारी तिजोरीत जमा करून त्याची रितसर पावती देण्याची मागणीही पत्राव्दारे केली आहे.
विश्वनाथ गोपाळराव नामपल्ले (ब.नं. ९५६) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस ठाण्यात हा शिपाई कार्यरत आहे. १ जानेवारी २०१५ रोजी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून या शिपायाने तुटपुंज भत्ते व मानधनाच्या समस्येला वाचा फोडली. साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केल्यास पोलीस शिपायांना केवळ ६८ रुपये मानधन दिले जाते. कामगार कायद्याप्रमाणे आठ तास काम केल्यास एक दिवसाचे वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र पोलिसांना कामगारांचा हा वेतनाचा नियमही लागू केला जात नसल्याचे वास्तव आहे. कर्मचारी आपल्या हक्काच्या सुटीच्या दिवशी कामावर हजर झाला म्हणून नियमित वेतनासोबतच त्याला अतिरिक्त वेतन देणे अपेक्षित आहे. परंतू येथे अतिरिक्त तरसोडा साधे एक दिवसाचे नियमित वेतनही पोलिसांना दिले जात नाही. नेमक्या याच समस्येकडे या शिपायाने आपल्या पत्रातून महासंचालकांचे लक्ष वेधले. विश्वनाथ नामपल्ले या शिपायाने साप्ताहिक सुटीच्या दिवशी ड्युटी केल्यास मिळणारे ६८ रुपयांचे मानधन नाकारले आहे. हे मानधन मला नको, एक दिवसाचे वेतन दिले तरच ते आपल्याला मान्य राहील अन्यथा मी ते स्वीकारणार नाही, ही रक्कम शासनाच्या खात्यात जमा करून त्याची रितसर पावती मला द्यावी, असेही या शिपायाने पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या डझनावर समस्या आहेत. वेतन, भत्ते, निवासस्थान, ड्युटीचे तास, साप्ताहिक सुट्या, सोईसुविधा, वागणूक, राजकीय हस्तक्षेप, वरिष्ठांकडून होणारा छळ असे विविध प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहेत. त्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागत आहे. महसूल खात्याप्रमाणे पोलिसांनाही वेतनश्रेणी लागू करावी, यासाठी नागपूर ‘मॅट’मध्ये पोलिसांची आधीच कायदेशीर लढाई सुरू आहे.
महसूल खात्यात आठ तास काम करणाऱ्या वर्ग ३ च्या कर्मचाऱ्याला ५ हजार ८०० रुपये तर वर्ग दोनच्या अधिकाऱ्याला १० हजार ८०० रुपये मूळ वेतन आहे.
पोलीस खात्यात १२ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ५ हजार ३०० रुपये तर २४ तास काम करणाऱ्या अधिकाऱ्याला १० हजार १०० रुपये मूळ वेतन आहे.
महसूल खात्याला सर्व प्रकारचे सण-उत्सव व साप्ताहिक सुटी ठरलेली आहे. तर पोलीस खात्याला सण-उत्सवात कायम बंदोबस्तात रहावे लागते. आठवड्याची हक्काची सुटीही मिळण्याची शाश्वती नसते. आजारी रजेसाठीही वरिष्ठांच्या विनवण्या कराव्या लागतात.
पोलीस खात्यात वर्ग ३ च्या कर्मचाऱ्याला एक दिवसाचे वेतन ६५० रुपये व वर्ग २ च्या अधिकाऱ्याला ११५० रुपये मिळते. मात्र साप्ताहिक सुटी अथवा सुट्या बंदच्या काळात काम केल्यास मोबदला म्हणून अनुक्रमे केवळ ६८ आणि ९० रुपये दिला जातो.