मराठा समाजासाठी १३ टक्केजागा राखीव ठेवून पोलीस भरती - गृहमंत्री देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:46 AM2020-09-18T03:46:59+5:302020-09-18T06:26:04+5:30
पोलीस भरती ही आज ना उद्या करावीच लागेल. भरतीमध्ये ओबीसी व इतर समाजांवर अन्याय होता कामा नये; पण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे जाणार आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने राज्यात साडेबारा हजार पोलीस शिपायांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, मराठा समाजासाठी १३ टक्के पदे राखीव ठेवून अन्य ८७ टक्के पोलीस शिपाईपदे भरण्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. यासंदर्भात विधी व न्याय विभागाचा सल्ला मागविण्यात येईल, असे ते म्हणाले. मराठा समाजातील तरुणांवर सरकार अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पोलीस भरती ही आज ना उद्या करावीच लागेल. भरतीमध्ये ओबीसी व इतर समाजांवर अन्याय होता कामा नये; पण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे जाणार आहे.
तेथील निकाल येत नाही, तोवर भरती करू नये, ती आताच केली, तर मराठा समाजाचे नुकसान होईल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले, तर छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा नाजूक बनलेला असताना पोलिसांची मेगाभरती करणे हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.