"राज्यात पोलीस भरती होणार, पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 01:48 PM2021-01-23T13:48:25+5:302021-01-23T13:49:05+5:30
Anil Deshmukh : नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषेदेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते.
नागपूर : मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असली तरी राज्यात पोलीस भरती होईल. तसेच, पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. पण, याबाबत आम्ही मराठा नेत्यांशी चर्चा असून त्यांना राज्यात पोलीस भरती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ही गोष्ट त्यांनाही पटल्यामुळे मराठा नेत्यांनी पोलीस भरती प्रक्रियेला सहमती दर्शविली दिली आहे. त्यामुळे आता पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया योग्यरित्या पार पडेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
याचबरोबर, पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात होईल, असे अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी 2538 जागांची भरती झाल्यानंतर पुन्हा गरज पडल्यास आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले होते.
'येरवडा कारागृहात जेल टुरिझम सुरू करणार'
२६ जानेवारी पासून येरवडा कारागृहात जेल टुरिझम सुरू करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकारांना दिली. भारतातील पर्यटनाचा हा पहिला उपक्रम असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुण्यातील येरवडा कारागृहात २६ जानेवारीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
...म्हणून मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या
राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ‘एसईबीसी’चे आरक्षण न ठेवता राज्याच्या गृह विभागाकडून निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. एसईबीसी आरक्षण न देता पोलीस भरती प्रक्रिया राबवली तर मराठा समाजाकडून उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा संघटनांकडून देण्यात आला होता.