पोलिस निवासस्थानांची दुरवस्था
By admin | Published: May 12, 2014 10:19 PM2014-05-12T22:19:20+5:302014-05-12T22:35:15+5:30
बंदोबस्तासाठी आलेले कर्मचारी ठोकतात तंबू
जलंब: येथील पोलिस निवासस्थानाची अवस्था अत्यंत दयनिय झाल्यामुळे निवासस्थानांमध्ये राहणार्या पोलिसांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या निवासस्थानांकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे निवासस्थांनांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जलंब येथे ब्रिटीश काळापासून पोलिस स्टेशन आहे. या पोलिस स्टेशन अंतर्गत ४0 खेड्यांचा समावेश आहे. यासर्व गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून येथे ३५ पोलिस कर्मचारी व एक अधिकारी कार्यरत आहे. या ठिकाणी पोलिसांसाठी २२ निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. मात्र, उभारण्यात आल्यानंतर या निवासस्थानांची देखभालच करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता केवळ ५-६ निवासस्थानेच राहण्याजोगे आहेत. उर्वरीत सर्वच निवास्थानांना नरकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामध्ये बहुतांश निवासस्थानातील शौचालयाचे दरवाजे तुटले आहे. तर काही निवासस्थानाला दरवाजेच नाही. काही वर्षाअगोदर पोलिस निवासस्थानाची फक्त थातुरमातूर डागडुजीचे काम करण्यात आले होते. एक ना अनेक समस्या असलेल्या पोलिस कर्मचार्यांना जिव मुठीत धरुन आपले कर्तव्य बचावत राहावे लागते. पोलिसांना रात्रीच्या वेळी तडे गेलेल्या भिंतीच्या आत साप, विंचू येण्याच्या दहशतीत रात्र काढावी लागते. भिंती इतक्या जीर्ण झाल्या आहेत की उंदीर सुध्दा भिंतीवरुन गेल्यास खाली रेती व माती पडत आहे. त्याचबरोबर निवासस्थानांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने पोलिसांच्या समस्येत अधिकच भर पडत आहे. डोळ्यात तेल घालून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी असणार्या पोलिसांच्या घराचे रक्षण कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला असूून जुनाट जिर्ण झालेली निवासस्थाने पाडून सर्व पोलिस कर्मचार्यांसाठी नवीन पोलिस निवासस्थाने निर्माण करण्याची वेळ आली आहे. याकडे त्वरीत लक्ष देण्याची मागणी होत आहे.
** आतापर्यंत झाले केवळ वरवरचे काम
सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवासस्थानांची देखभालच केली नसल्याची परिस्थिती आहे. या निवासस्थानांच्या दुरूस्तीच्या नावावर लक्षावधी रूपयांचा मलिदा लाटण्यात आला. प्रत्यक्षात मात्र, येथे कवडीही खर्च करण्यात आली नसल्याचे चित्र आहे. निवासस्थाने मोडकळीस आल्याने येथे वास्तव्यास असलेल्या पोलिस कर्मचार्यांना निवासस्थानाशेजारी झोपड्या उभारून, टिनशेड टाकून कसाबसा निवार्याचा आसरा घ्यावा लागतो.
** बंदोबस्तासाठी आलेले कर्मचारी ठोकतात तंबू
जलंब पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संवेदनशील गावात बंदोबस्तासाठी येणार्या पोलिसांना चक्क तंबू ठोकून आपले कर्तव्य बजवावे लागते. तंबू ठोकण्यासाठी कुठलाही पर्यायच येथे उपलब्ध नाही. विश्रामगृहाला मालखाना करण्यात आल्याने पोलिसांना विश्रामासाठी कोणतीही व्यवस्था येथे उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. जलंब : निवासस्थानाची दुरवस्था झाल्याने पोलिसांनी पर्यायी निवारा उभारला आहे. शिकस्त झालेली इमारत.