पोलिसांनो, मोबाइलची रिंगटोन चांगली ठेवा
By Admin | Published: December 24, 2015 02:34 AM2015-12-24T02:34:55+5:302015-12-24T02:34:55+5:30
पोलीस खात्यातील शिस्तीप्रमाणेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोबाईल रिंगटोन सभ्य असावी. पोलिसांनी कर्णकर्कश, फिल्मी गाणे किंवा प्राणी-पक्ष्यांच्या आवाजातील रिंगटोन ठेवू नये
औरंगाबाद : पोलीस खात्यातील शिस्तीप्रमाणेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोबाईल रिंगटोन सभ्य असावी. पोलिसांनी कर्णकर्कश, फिल्मी गाणे किंवा प्राणी-पक्ष्यांच्या आवाजातील रिंगटोन ठेवू नये, असा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे^-पाटील यांनी त्यांच्या अखत्यारीतील मराठवाड्यामधील पोलीस ठाण्यांना दिला आहे.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाइल हे खासगी मालकीचे असले, तरी त्यांच्या विचित्र रिंगटोनमुळे खात्याची प्रतिमा मलिन होते. नांगरे-पाटील यांनी ही बाब हेरली. बऱ्याच वेळा चित्रपटांमधील भडक गाणी, प्राणी-पक्ष्यांच्या आवाजात पोलिसांच्या मोबाइलवर रिंगटोन वाजत असते. नांगरे यांनी अखेर यावर बडगा उगारला आहे.
पोलीस दल हे शिस्तप्रिय समजले जात असल्याने अशा गाण्यांच्या रिंगटोन ठेवणे शोभादायक ठरत नसल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे. औरंगाबाद
शहर वगळता मराठवाड्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी उपरोक्त आदेशच जारी केला आहे. त्यात त्यांनी सभ्यतेला छेद देणाऱ्या रिंगटोन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)