पोलिसांनीच लाटले चोरीतील नऊ कोटी
By admin | Published: April 17, 2017 03:30 AM2017-04-17T03:30:18+5:302017-04-17T03:30:18+5:30
येथील शिक्षक कॉलनीतील ३ कोटींच्या चोरी प्रकरणात छापा टाकायला गेलेल्या पोलिसांनी, तेथे मिळालेले तब्बल ९ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप केल्याचे तपासात उघड झाले आहे
कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील ३ कोटींच्या चोरी प्रकरणात छापा टाकायला गेलेल्या पोलिसांनी, तेथे मिळालेले तब्बल ९ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप केल्याचे तपासात उघड झाले आहे. सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षकासह सात कर्मचाऱ्यांवर रविवारी पहाटे कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सर्व संशयित पोलीस फरार झाले आहेत.
प्रकरणाची मोठी व्याप्ती असल्याने, गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलीस हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मोहीद्दीन उर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा), प्रवीण भास्कर-सावंत (रा. वासूद, जि. सांगोला) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सर्व संशयितांना तत्काळ अटक करण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी करवीर विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना दिले.
मार्च २०१६ मध्ये सांगली पोलिसांना मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम मिळाली होती. त्यानंतर, तपासामध्ये मैनुद्दीन याने वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील बिल्डिंग नंबर ५ मध्ये केलेल्या चोरीतील ही रक्कम असल्याचे कबूल केले. त्यानुसार, पुन्हा वारणानगरातील एका रूमवर छापा टाकल्यावर, तेथे आणखी एक कोटी ३१ लाख २९ हजार रुपये मिळाल्याचे पोलिसांनी दाखविले होते. त्याच वेळी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक व मल्टिडेव्हलपर्सचे मालक झुंजार माधवराव सरनोबत यांनी ही रक्कम आपली असून, ३ कोटी ११ लाख रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद
दिली होती. त्यानंतर, सांगली पोलिसांनी मैनुद्दीनचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे दिला होता. (प्रतिनिधी)
अशी केली हेराफेरी
येथील शिक्षक कॉलनीच्या बिल्डिंग नंबर ५ मधील रूममध्ये तपास अधिकाऱ्यांना ११ कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम मैनुद्दीनच्या नावाखाली चोरीची असल्याचे दाखवून घनवट व सहकाऱ्यांनी ३ कोटी १८ लाख रुपये परस्पर घेतले, तर सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिवे व सहकाऱ्यांनी ६ कोटी रुपये घेऊन ते नातेवाईकाच्या बँक खात्यावर भरले.