पोलिसांच्या दिमतीला ३ रोबो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:40 AM2017-07-21T02:40:10+5:302017-07-21T02:40:10+5:30

महानगरातील महत्त्वाच्या ठिकाणच्या संशयास्पद वस्तू, व्यक्तीची छाननी व ते निकामी करण्यासाठी पोलिसांना आता आपला जीव धोक्यात घालावा लागणार नाही.

Police Robot 3 | पोलिसांच्या दिमतीला ३ रोबो

पोलिसांच्या दिमतीला ३ रोबो

Next

- जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महानगरातील महत्त्वाच्या ठिकाणच्या संशयास्पद वस्तू, व्यक्तीची छाननी व ते निकामी करण्यासाठी पोलिसांना आता आपला जीव धोक्यात घालावा लागणार नाही. रोबोद्वारे (यंत्रमानव) हे काम केले जाणार असून येत्या २-३ दिवसांमध्ये तीन यंत्रमानव मुंबई पोलीस दलात रुजू होणार आहेत. बॉम्ब शोध व नाशक पथकाच्या (बीडीडीएस) दिमतीला ते असणार आहेत.
एका रोबोची किंमत सुमारे ८४ लाख इतकी असून पहिल्या टप्प्यात तीन रोबो खरेदी करण्यात आले आहेत. त्याचा वापर मुंबईत केला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
२६/११ च्या घटनेनंतर पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र स्फोटके व घातक वस्तूचा शोध व त्याचा नाश करण्यासाठी प्रगत देशामध्ये वापर केल्या जाणाऱ्या रोबोची महाराष्ट्र पोलीस दलाकडे कमतरता होती. ते उपलब्ध करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून महासंचालक कार्यालयाकडून खरेदीबाबतची प्रक्रिया सुरू होती. अखेर गेल्या वर्षी त्याबाबतच्या विविध छाननी व प्रात्यक्षिक घेतल्यानंतर सर्व निकषांमध्ये पात्र ठरलेल्या सिक्युरिटी शॉपी या कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात आले. एका रोबोची किंमत ८३ लाख ३२ हजार रुपये इतकी असून पहिल्या टप्प्यात ३ रोबो खरेदी केले. पूर्वनियोजनाप्रमाणे या कंपनीने मे महिन्यामध्ये मुंबई पोलिसांना त्याची उपलब्धता करावयाची होती. हैदराबाद येथील वितरकाकडून त्यांची डिलीव्हरी केली जाणार होती. मात्र या रोबोमधील काही महत्त्वाच्या पार्टची पूर्तता न झाल्याने ते पाठविण्यात आले नाहीत. येत्या २२ जुलैपर्यंत मुंबई पोलिसांकडे त्यांची पूर्तता करत असल्याचे कंपनीने कळविले आहे.
अतिरेक्यांच्या ‘टार्गेट’वर असलेल्या मुंबईमध्ये पहिल्यांदा त्याचा वापर करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या खरेदीमध्ये राज्यातील अन्य प्रमुख शहरांमध्ये ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मनुष्यबळाची गरज नाही
स्फोटकांचा शोध घेत त्याच्याकडून ते निकामी केले जाईल. या कामासाठी मनुष्यबळाची आवश्यकता लागणार नाही. संशयास्पद व धोकादायक वस्तूबाबत ‘कॉल’ आल्यानंतर बीडीडीएसच्या पथकाकडून ते संबंधित ठिकाणी नेले जाईल. त्या परिसराची छाननी रोबोकडून केली जाईल. त्याला दिलेल्या सूचनांनुसार ते संबंधित वस्तूचा शोध घेत कार्यवाही केली जाईल.

Web Title: Police Robot 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.