पोलिस म्हणाले, खूश कर, सोडून देतो - पिडीत मॉडेलचा दावा

By Admin | Published: April 27, 2015 04:00 AM2015-04-27T04:00:01+5:302015-04-27T13:00:23+5:30

बलात्कारासारख्या घृणास्पद, नकोशा घटनेला तोंड दिलेल्या मॉडेलने व अभिनेत्री व्हायची इच्छा असलेल्या तरुणीने या प्रकरणाचा अगदी शेवटपर्यंत पाठपुरावा

The police said, pleased and released - the victim model claims | पोलिस म्हणाले, खूश कर, सोडून देतो - पिडीत मॉडेलचा दावा

पोलिस म्हणाले, खूश कर, सोडून देतो - पिडीत मॉडेलचा दावा

googlenewsNext

डिप्पी वांकाणी, मुंबई
बलात्कारासारख्या घृणास्पद, नकोशा घटनेला तोंड दिलेल्या मॉडेलने व अभिनेत्री व्हायची इच्छा असलेल्या तरुणीने या प्रकरणाचा अगदी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे. या बलात्काराच्या घटनेने तिचे आयुष्यच बदलून गेले. तीन पोलीस व अन्य पाच जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पंजाबमधून सुरू झालेला तिचा प्रवास आॅस्ट्रेलियामार्गे चित्रपटांच्या मोहमयी दुनियेत म्हणजे मुंबईपर्यंत झाला. ‘त्या’ सगळ्या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचा क्रम तिने धाडसाने ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. टेलिफोनवर ३२ मिनिटे ही मुलाखत चालली. सध्या ही तरूणी मुंबईपासून दूर राहात आहे.
या दीर्घ मुलाखतीचा हा संपादित सारांश:
- तो सगळाच काळ तू आणि तुझ्या कुटुंबियांसाठी दमवून टाकणारा असेल. तू त्याचा कसा सामना करत आहेस?
पीडित मॉडेल : माझे वडील पंजाब सरकारच्या सेवेत होते. ते बरे होऊ शकणार नाहीत, असे आजारी असून गेल्यावर्षी त्यांना दोनवेळा रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यांना खूप बरे नसल्यामुळे मी त्यांच्याबरोबर गेल्या वर्षी संपूर्ण डिसेंबरमध्ये राहिले. माझी घटना जेव्हा त्यांना समजली तेव्हा ते पूर्णपणे हादरून गेले. माझी आई खूप रडत असून लग्न झालेल्या माझ्या बहिणीची तिला काळजी वाटत आहे कारण या घटनेचे परिणाम तिच्या आयुष्यावर होतील.
- तू या व्यवसायात कशी आलीस आणि मुंबईत केव्हापासून राहतेस? तुझा भूतकाळ कसा होता?
पीडित मॉडेल : माझा जन्म व संगोपन पंजाबमधील. तेथे शालेय शिक्षण झाल्यानंतर मी विमानसेवेशी संबंधित काही पदविका अभ्यासक्रमही केले. परंतु मला आणखी अभ्यास करायचा होता म्हणून मी एमबीए करण्यासाठी आॅस्ट्रेलियात गेले. २००८ ते २०१२ दरम्यान मी तेथे होते. तरीही माझ्या मनात आपण अभिनेत्री व्हावे, असे सारखे वाटायचे. अभिनयाच्या क्षेत्रात गांभीर्याने काम करायचे असेल तर मुंबईला जावेच लागेल, असे मला वाटले. त्यानंतर मी गेल्या आॅगस्टमध्ये येथे आले व तेव्हापासून येथे राहात आहे.
- चित्रपटात भूमिका देण्याची इच्छा असलेल्या गुजराती व्यावसायिक हाशमीची ओळख करून देणाऱ्या अमन याच्या संपर्कात तू कशी आली?
पीडित मॉडेल: मी त्याच्या संपर्कात इंटरनेटद्वारे आले आणि आमच्या या व्यवसायात कामासाठी आॅनलाईन नेटवर्क वापरले जाते. सहा महिन्यांपूर्वी मी पहिल्यांदा त्याच्या संपर्कात आले व केवळ दोनदा त्याची माझी भेट झाली. तो म्हणाला की,‘‘ हाशमीने तुझे फोटो बघितले असून तुला प्रत्यक्ष त्याला भेटायचे आहे, कारण व्यक्ती फोटोमध्ये आणि प्रत्यक्षात वेगळी दिसते. मी तयार झाले. परंतु रात्र खूप झाल्यामुळे ही भेट दुसऱ्या दिवशी सकाळी ठेवावी, असे मी त्याला सांगितले. पण त्याने मला,‘तू आताच त्याची भेट घेतली पाहिजे असा आग्रह केला.’ द्विधावस्थेत मी हॉटेलवर गेले आणि लॉबीत मला भेटण्यासाठी हाशमी आला. अमन, मी आणि हाशमीशी कॉन्फरन्स कॉलवर होता व हाशमीची माझी भेट झाल्यावर आमची कॉन्फरन्स संपली. त्याने मला त्याच्या खोलीत बोलावले. मला संशय आल्यामुळे मी त्याला ‘माझ्याकडे कुठलाही ओळखीचा पुरावा नसल्यामुळे मी त्याच्यासोबत जाऊ शकत नाही’, असे सांगितले. प्रत्यक्षात माझ्याकडे तेव्हा एक भारतीय व एक आॅस्ट्रेलियन ओळखपत्र होते.
 

- त्यानंतर काय घडले?
पीडित मॉडेल: मी माझ्या मित्राला फोन करून परिस्थितीची माहिती दिली. त्याने मला,‘तू ताबडतोब हॉटेलमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला व १५ ते २० मिनिटांत मी तुला घ्यायला येतोय,’ असेही सांगितले. त्याने सांगितल्यानुसार मी बाहेर पडले व माझा मित्र स्कूटरवर तेथे आला. आम्ही निघणार तोच साध्या कपड्यांतील काही लोक एका महिलेसह आमच्याजवळ आले आणि आम्ही पोलीस आहोत असे सांगून जबरदस्तीने त्यांनी आम्हाला पांढऱ्या टाटा सफारीमध्ये कोंबले. ‘तुम्ही आम्हाला का नेताय,’ असे विचारले असता ते म्हणाले की,‘ पोलीस ठाण्यात गेल्यावर आपल्याला सगळे समजेल.’

- त्यानतंर...?
पीडित मॉडेल: साकीनाका पोलीस ठाण्यास मी अधिकाऱ्याला (नंतर हा अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक खपटे असल्याचे स्पष्ट झाले) सांगितले की ‘मी प्रतिष्ठित कुटुंबातील असून घरी माझा १७ वर्षांचा भाऊ माझी वाट बघत आहे. माझा भाऊ सुटीनिमित्त मुंबईत आला असून त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ एप्रिल रोजी परत जायचे आहे.’ परंतु तो अधिकारी मी वेश्या असल्याचेच सांगत होता व माझा मित्र वेश्या धंद्यातील दलाल आहे, असे म्हणत होता. माझ्या मित्राने हस्तक्षेप करीत तो प्रतिष्ठित कंपनीत कामाला असून या शहरातील काही प्रतिष्ठित नावे मला माहिती आहेत, असे सांगितले. त्याने त्या लोकांना मी सांगतो ते फोन करून खात्री करून घ्या असेही सांगितले. पण त्यांनी तो जेव्हा केव्हा उभा राहायचा व नाव सांगायचा तेव्हा तेव्हा त्यांनी त्याला निष्ठूरपणे मारले.
त्यानंतर पुढे...?
पीडित मॉडेल: मी ढसाढसा रडत होते व ‘मला तुम्ही वेश्या ठरवल्याचे माझ्या आई-वडिलांना कळाले तर ते मरून जातील’, असे सांगितले. दरम्यान, त्यांनी माझ्या मित्राला दुसऱ्या खोलीत नेले व आम्हाला सोडण्यासाठी ते पैशाच्या वाटाघाटी करीत होते. त्यांनी सात लाख रुपये मागितले. पोलीस शिपाई माझ्या मित्रासोबत तेथून निघून गेला व मला मात्र ओलीस म्हणून अडवून ठेवले. त्यानंतर अधिकाऱ्याने संघर्ष पोलीस चौकीत मला नेले. एकदा आतमध्ये आल्यानंतर खपटेने दोन्ही खोल्या आतून बंद करून घेतल्या व तो माझा तीव्र विरोध असतानाही माझ्या अंगावर पडू लागला. ‘तू मला सुख दिले तर मी तुला सोडून देईन’, असेही तो मला म्हणाला. तो माझ्या अंगाला आक्षेपार्ह पद्धतीने हात लावू लागला व त्याचे सहकारी दार वाजवू लागले की तो ‘त्यांना अजून थोडा वेळ थांबा’, असे सांगायचा. हा सगळा प्रकार जवळपास तासभर चालला व नंतर त्याने दार उघडले.
- पुढे काय घडले?
पीडित मॉडेल : स्वत:ला पोलीस अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या त्या महिलेने माझ्या अंगावरील दागिने काढून घेऊन माझ्या बॅगेची तपासणी केली. तिला त्यात माझे आॅस्ट्रेलियन ओळखपत्र सापडले व त्यावरून तिला मी प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याचे लक्षात आल्यामुळे माझ्याकडून जास्त पैसा काढता येईल, असे त्यांना समजले. अधूनमधून ते एकमेकांशी ‘जल्दी करो, डीसीपी का राऊंड है’, असे म्हणत. त्यामुळे त्यांना कशाची तरी भीती वाटत होती हे माझ्या लक्षात आले. माझा छळ आणि विनयभंग करण्यात आला. त्यानंतर अधिकारी फोनवर पोलीस शिपायाशी माझ्या मित्राने पैशांची काही सोय केली का, असे बोलत होते.

- पोलीस चौकीतून तुला कधी बाहेर जाऊ दिले व तू नंतर काय केलेस?
पीडित मॉडेल: रात्री साधारणत: ९.५५ वाजता पोलीस शिपायाने मला आॅटोरिक्षातून पुन्हा पोलीस ठाण्यात आणले. त्यांनी माझ्यासाठी १५०० रुपये ठेवले होते. पोलीस ठाण्यात महिलेने १२०० रुपये घेऊन मला त्याची पावती दिली. माझ्या मित्राने शेवटी दुपारी कसेबशी पैशांची जुळवाजुळव केली व नंतर मी त्याच्याशी संपर्क साधू शकले. आम्ही कूपर हॉस्पिटलला माझ्या वैद्यकीय तपासणीसाठी गेलो. ६ एप्रिल रोजी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या कार्यालयाला तक्रार दिली.

- त्या लोकांना डीसीपींच्या राऊंडची भीती वाटत असतानाही तू ताबडतोब कोणत्याही स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार का दाखल केली नाहीस?
पीडित मॉडेल: त्यांनी मला कशाही धमक्या दिल्या होत्या त्यामुळे मी तेव्हा खूप घाबरलेली होते. मी तेव्हा हा विचार केला की डीसीपींची मला जर काही मदत झाली नाही तर अधिकाऱ्यांकडून माझ्यावर हल्ला होईल. शिवाय माझ्या मित्राने पोलीस आयुक्त चांगले अधिकारी असल्यामुळे तू थेट त्यांच्याकडेच जावे असा सल्ला दिला होता.

-  पोलीस आयुक्तांची भेट झाल्यावर काय घडले?
मॉडेल: मी लगेचच वकिलाला भेटले व त्याने मला सरकारी रूग्णालयात माझी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे सल्ला दिला. त्याप्रमाणे मी ताबडतोब तपासणी करून घेतली. एक तपासणी प्रलंबित असली तरी सगळ््या तपासण्यांचे अहवाल मला एकत्रच मिळतील. माझ्या वकिलाने तक्रार अर्ज तयार केला व तो त्याने ६ एप्रिल रोजी पंतप्रधान, मुख्यमंत्री व राकेश मारिया यांच्या कार्यालयाला पाठविला. ६ एप्रिल रोजीच मी मारियांच्या कार्यालयात गेले परंतु ते पोट निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या सहायकाने मला ते मला भेटू शकणार नाहीत, असे सांगितले. त्यानंतर मला आरोपीकडून सतत फोन येत असल्यामुळे मुंबईत राहायला मी घाबरले होते म्हणून मी ८ एप्रिल रोजी माझ्या मूळ गावी गेले व १८ एप्रिल रोजी मुंबईत परतले. १९ एप्रिल रोजी रविवार असल्यामुळे मी मारियांना भेटण्यासाठी २१ एप्रिल रोजी (मंगळवार) गेले. त्यावेळीही ते व्यस्तच असल्याचे मला सांगण्यात आले. मी त्यांना एसएमएस केला. त्यांनी मला २२ एप्रिल रोजी भेटायला बोलावले.

Web Title: The police said, pleased and released - the victim model claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.