मद्यपान करून वाहन चालवल्यास पोलीस उतरवतील झिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 01:49 AM2019-12-29T01:49:50+5:302019-12-29T01:50:02+5:30
नवीन वर्षाचे स्वागत करताना घ्या काळजी; मद्यपी व्यक्तीसोबत वाहनातून गेला तरी होणार कारवाई
- जितेंद्र कालेकर
ठाणे : नवीन वर्ष स्वागताच्या निमित्ताने होणाऱ्या पार्टीसाठी कुठेही जाताना मद्य प्राशन करून जर कोणतेही वाहन चालविणार असाल तर थांबा. दरवर्षी थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या धुंदीत अनेक जण मद्य प्राशन करून वाहने चालवितात. यातून होणाºया वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक आणि महामार्ग पोलीस राज्यभर व्यापक प्रमाणावर कारवाई करणार आहेत. चालकासह त्याच्यासह प्रवाशांवरही कारवाई केली जाणार असल्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पोलीस कोठडीत जाण्याची नामुष्की येऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरवर्षी थर्टी फर्स्ट अर्थात ३१ डिसेंबर मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांना जाण्यासाठी किंवा पार्ट्या करून येणारी मंडळी अती उत्साहाच्या भरात मद्य प्राशन करूनच वाहने चालवतात. अनेकदा या पार्ट्यांना जाणारी मंडळीही मद्य प्राशन करून वाहन चालविणाºयाला आक्षेप घेत नाही. यातूनच ऐन नववर्षाच्या स्वागताच्या रात्रीच प्राणांतिक अपघात होतात. अनेक जण गंभीर जखमी होऊन जायबंदीही होतात.
राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये सरत्या वर्षातील शेवटचा आणि नवीन वर्षातील पहिला गुन्हा हा देखील अपघाताचा अगदी फेटल (प्राणांतिक अपघाताचा) नोंद झालेला आहे. त्यामुळेच अशा मद्यपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या वेळी ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यासह संपूर्ण राज्यात कडक कारवाईचे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातही महामार्ग तसेच शहरातील नाक्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने ५४ ब्रीथ अॅनलायझेरच्या (श्वास विश्लेषक यंत्रणा) माध्यमातून १८ युनिटमधील पथकांच्या माध्यमातून कारवाईचे आदेश वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी २८ ते ३१ डिसेंबर २०१८ रोजी ठाण्यात दोन हजार ८५० तळीरामांवर कारवाई झाली होती. यात केवळ ३१ डिसेंबर २०१८ रोजी या एकाच दिवसात १३५० मद्यपी चालकांवर कारवाई झाली होती. यावर्षीही ही मोहीम ठाणे ग्रामीण आणि शहर पोलिसांतर्फे तीव्रपणे केली जाणार आहे. सहप्रवाशांवरही चालकाला प्रोत्साहन दिल्याबद्दल एक ते तीन महिन्यांसाठी साध्या कैदेचीही तरतूद आहे. याशिवाय, कलम १८८ नुसार भरघाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. तसेच त्याचे लायसन्स आरटीओकडे पाठवून ते ३ महिने निलंबित करण्याची शिफारस केली जाते़ जर त्याने ३ वर्षांच्या आत मद्यप्राशन करून गुन्हा केला असल्याचे आढळून आले तर, त्याचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची आरटीओला शिफारस केली जाते़