पोलिसाच्या पत्नीला शिक्षा
By admin | Published: October 22, 2014 06:06 AM2014-10-22T06:06:08+5:302014-10-22T06:06:08+5:30
सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या पतीच्या डोक्यात भांडणात हातोडा घालणाऱ्या पत्नीला सत्र न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा ठोठावली़ पार्वती असे या पत्नीचे नाव आहे़
मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या पतीच्या डोक्यात भांडणात हातोडा घालणाऱ्या पत्नीला सत्र न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा ठोठावली़ पार्वती असे या पत्नीचे नाव आहे़
पार्वती हिने घटनेनंतर स्वत: पवई पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली होती़ मात्र अॅड़ अमित मुंडे यांनी पार्वतीचा पती नंदकिशोर तपसाळकर यांना जीवे मारण्याचा हेतू नव्हता, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ ते ग्राह्य धरत सत्र न्यायाधीश डब्ल्यू़ डी़ देशपांडे यांनी पार्वतीला खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी सहा वर्षांची शिक्षा ठोठावली़ ही घटना २८ एप्रिल २०१३ रोजी घडली़ मरोळ पोलीस कॅम्पमध्ये राहणारे नंदकिशोर यांचे पार्वतीसोबत भांडण झाले़ त्यावेळी पार्वतीने पोलिसांना फोन केला व त्याची दखल घेत पवई पोलिसांनी नंदकिशोर यांना ताब्यात घेतले़ काही वेळाने पोलिसांनी त्यांना सोडून दिले़
त्यानंतर पुन्हा नंदकिशोर व पार्वती यांच्यात भांडण झाले़ तेव्हा पार्वतीने नंदकिशोर यांच्या डोक्यात हातोडा घातला़ त्यामुळे नंदकिशोर बेशुद्ध पडले़ याने अस्वस्थ झालेल्या पार्वतीने थेट पोलीस ठाणे गाठले व घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली़ तर दुसरीकडे नंदकिशोर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले़ या प्रकरणी प्रथम पार्वतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला़ नंतर तिच्यावर खुनाचा आरोप ठेवला़ (प्रतिनिधी)