रायगडावर पोलिसांचा बंदोबस्त
By admin | Published: September 24, 2016 02:42 AM2016-09-24T02:42:18+5:302016-09-24T02:42:18+5:30
छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शनिवारी २४ सप्टेंबरला आयोजन करण्यात आलेल्या शिवशाही संकल्प मेळावा
महाड : छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शनिवारी २४ सप्टेंबरला आयोजन करण्यात आलेल्या शिवशाही संकल्प मेळावा आणि शाक्त राज्याभिषेक सोहळ्याला परिसरातील ग्रामपंचायतींनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी किल्ले रायगड आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असून या परिसरात अक्षरश: पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे रायगड जिल्हा प्रशासनाने गुरुवारी रात्री १२ वा. पासून ५ आॅक्टोबरपर्यंत रायगड जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे गड परिसरात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड आणि टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने शनिवारी किल्ले रायगडावर दंगामुक्त महाराष्ट्रासाठी शिवशाही संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यासह राज्यभरातील ४० मराठा संघटनांनी या मेळाव्याला पाठिंबा दिला आहे. या मेळाव्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त पद्धतीने राज्याभिषेक सोहळा आणि दंगामुक्त महाराष्ट्र संकल्प सोडण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन तणपुरे भूषविणार असून शेकापचे आ. जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे आहेत. मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आरकरे, जमात-ए- इस्लामिक हिंद संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तौफिक आस्लम, संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष सुधीर भोसले याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. इतिहासकार श्रीमंत कोकाटे, सुभान अली शेख, अमोल मेटकरी आदि इतिहास विचारवंतांची यानिमित्त व्याख्याने होणार असून स. ९.३० ते दु. २.३० वा. पर्यंत हे कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमापूर्वी बौद्ध पद्धतीनेही राज्याभिषेक सोहळा होण्याची शक्यता आहे. याला काही शिवप्रेमी संघटना आणि परिसरातील काही ग्रा. पं. नी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे गडाकडे जाणारे सर्व रस्ते व गडाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या कार्यक्रमाला पन्नास हजार शिवभक्त गडावर उपस्थित राहणार असल्याचे संकेत संयोजकांनी सांगितले आहे.मात्र पावसामुळे गडावर किती उपस्थिती राहते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
>शिवसमाधीवर बंदोबस्त
किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी या शिवरायांच्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा उखडून दरीत फेकून देण्यात आला होता. त्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिवसमाधी परिसराला पोलीस तैनात आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू के ला आहे. महामार्गापासून रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहनांचीही तपासणी केली जात आहे.