पोलीस पथक स्फोटातून बचावले, नक्षलवाद्यांचा घातपात करण्याचा डाव निष्फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 01:22 AM2018-07-31T01:22:37+5:302018-07-31T01:22:42+5:30
नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी अभियान राबविणारे पोलीस पथक पायी जात असताना मुख्य मार्गालगत हे दोन स्फोट झाले.
घोटा (गडचिरोली) : नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी अभियान राबविणारे पोलीस पथक पायी जात असताना मुख्य मार्गालगत हे दोन स्फोट झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घातपात घडविण्याचा नक्षल्यांचा डाव निष्फळ ठरल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील रेगडी उपपोलीस ठाण्यांतर्गत येणाºया रेगडी-कसनसूर मार्गावर रात्री नक्षलवाद्यांनी कुकरच्या साहाय्याने बनविलेला एक प्रेशर बॉम्ब (आयईडी) आणि लोखंडी पाईपमध्ये छर्रे भरून तयार केलेला एक क्लेमोर बॉम्ब जमिनीत पेरून ठेवला होता. पोलीस ठाण्यापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर विकासपल्ली फाट्याजवळ नक्षल्यांनी आपले बॅनर लावल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने ते काढण्यासाठी पोलीस पथक गेले होते. तेथून ठाण्याकडे येत असतानाच पोलीस पथकापासून १०० फूट अंतरावर दोन्ही बॉम्बचा एकामागोमाग स्फोट झाला.
याचवेळी एक युवक रस्त्याच्या कडेने झुडुपात लपत पळून जाताना आढळला. पोलिसांनी त्याचा
पाठलाग करण्याचा प्रयत्न केला,
मात्र तो जंगलात दिसेनासा
झाला. दोन्ही बॉम्बमध्ये सुमारे २० फुटांचे अंतर होते.
...तर झाली असती जीवित हानी
या दोन बॉम्बपैकी प्रेशर बॉम्बच्या स्फोटामुळे साडेतीन फूट रुंद आणि तीन फूट खोल खड्डा पडला आहे. पोलीस पथक त्या ठिकाणाच्या जवळ असते तर मोठी जीवित हानी झाली असती. या स्फोटानंतर त्या परिसरात आणखी बॉम्ब पेरले आहेत का, याची तपासणी करण्यात आली.
२८ जुलैपासून सुरू झालेल्या नक्षल शहीद सप्ताहादरम्यान पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे आतापर्यंत हा स्फोट वगळता कोणतीही हिंसक घटना घडवून आणण्यात नक्षलवाद्यांना यश आलेले नाही.