पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी पोलीस पथक यवतमाळात, पाच सदस्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 02:02 AM2021-02-16T02:02:29+5:302021-02-16T02:02:50+5:30
Pooja Chavan suicide case : पुणे येथील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूजा चव्हाण (२२, रा. परळी, जि. बीड) या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
यवतमाळ : पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात सोमवारी पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच सदस्यीय पथक यवतमाळात धडकले. पूजावर येथे उपचार झाले का, हे तपासण्यासाठी या पथकाने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन अधिष्ठाता डाॅ. मिलिंद कांबळे यांचा जबाब नोंदविला.
पुणे येथील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूजा चव्हाण (२२, रा. परळी, जि. बीड) या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाची तार थेट यवतमाळशी जुळलेले असल्याचे चर्चिले गेले. पूजावर यवतमाळात उपचार केले गेल्याचाही संशय पोलिसांना आहे. याच अनुषंगाने तपास करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक जयंत जाधव यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक सोमवारी यवतमाळात येऊन गेले. या पथकाने दिवसभर शासकीय रुग्णालय परिसराची बारकाईने पाहणी केली. यंत्रणेकडून काही धागा मिळतो का, या दृष्टीने चाचपणी केली. अधिष्ठाता डाॅ. मिलिंद कांबळे यांना संबंधित घटनेच्या माहितीबाबत सूचनापत्र दिले. पूजा हिचे नाव बदलवून तर उपचार करण्यात आला नाही ना, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.
पुणे पोलिसांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांकडे १ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत पूजा चव्हाण नावाच्या मुलीने स्रीरोग विभागात ट्रिटमेंट घेतली काय, याची लिखित माहिती मागितल्याचेही सांगितले जाते. या पथकाने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशीही या प्रकरणी चर्चा करून आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
मध्यरात्री ‘एचएमआयएस’ कक्ष का उघडला?
- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपचारार्थ दाखल रुग्णांची नोंद एचएमआयएस (हाॅस्पिटल मॅनेजमेंट इंटिग्रेटेड सिस्टिम) प्रणालीवर घेतली जाते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा संदर्भ येताच येथेही हालचाली सुरू झाल्या.
- शनिवारी मध्यरात्रीनंतर एचएमआयएस कक्ष उघडण्यात आला. इतक्या रात्री हा कक्ष उघडण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे.
- त्याबाबत तेथील यंत्रणेत वेगवेगळे अंदाज वर्तविले जात असून, कक्ष उघडण्याच्या घटनेकडे साशंकतेने पाहिले जात आहे. कक्ष उघडण्याचा हा प्रकार पुणे ग्रामीण पोलिसांसाठी तपासाचा धागा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.