रेल्वे फाटकांवर पोलीस तैनात
By Admin | Published: November 4, 2016 03:32 AM2016-11-04T03:32:51+5:302016-11-04T03:32:51+5:30
कल्याण ते ठाणेदरम्यान रेल्वे मार्गावर विविध कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
डोंबिवली : कल्याण ते ठाणेदरम्यान रेल्वे मार्गावर विविध कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे पोलीस दलाने रेल्वे फाटकांत पोलीस तैनात केले आहेत. ते प्रवाशांना ट्रॅकमधून जाण्यास मज्जाव करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना जिने चढून फलाट गाठावा लागत आहे. ठाकुर्लीत या प्रयत्नांना यश येत आहे.
ठाकुर्ली, दिवा, कळवा आणि ठाणे स्थानकादरम्यान पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ठाकुर्लीत फाटकातून रूळ ओलांडणारे तसेच ठाण्यात फलाट क्रमांक-२ वरून सिडको स्टॉपच्या दिशेने रुळांतून चालत जाणाऱ्यांना यामुळे चाप बसला आहे. ठाकुर्लीत फाटक उघडल्यावर वाहनांबरोबर प्रवासी ये-जा करतात. ठाकुर्लीत सरकत्या जिन्याची सुविधा नाही. त्यामुळे वृद्ध व्यक्ती, अवजड सामान घेऊन जाणाऱ्यांचे हाल होतात. ते फाटक उघडण्याची वाट पाहतात. प्रवाशांची रूळ ओलांडण्याची सवय सोडवणे एक आव्हान असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे ठाकुर्लीत अपघाताचे प्रमाण शून्यावर आले आहे. अन्य ठिकाणीही त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. प्रवाशांनीही सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने केले आहे. (प्रतिनिधी)