हळदी समारंभात पोलिसांचा लाठीहल्ला
By admin | Published: April 21, 2017 03:35 AM2017-04-21T03:35:50+5:302017-04-21T03:35:50+5:30
कोपरखैरणेत हळदी समारंभात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजेवर पोलिसांनी गुरुवारी पहाटे कारवाई केली. ग्रामस्थांनी कारवाईला विरोध केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला
नवी मुंबई : कोपरखैरणेत हळदी समारंभात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजेवर पोलिसांनी गुरुवारी पहाटे कारवाई केली. ग्रामस्थांनी कारवाईला विरोध केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यात चौघे जखमी झाले. जखमीत एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. जखमींना महापालिकेच्या प्रथम संदर्भा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, २0 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोपरखैरणे सेक्टर १९ येथे बुधवारी रात्री कुंदन गणेश म्हात्रे यांच्या घरी हळदी समारंभ होता. त्यासाठी डीजे लावला होता. नियमानुसार रात्री दहा वाजेपर्यंत डीजे वाजविण्याची मुभा आहे. मात्र येथे रात्री उशिरापर्यंत डीजे सुरू होता. सूचना देऊनही डीजे बंद न केल्याने अखेर पोलीस उपनिरीक्षक विकास सूर्यवंशी काही पोलीस कर्मचारी व ध्वनिमापक पथकासह आले. त्यांनी डीजेच्या ध्वनीची तीव्रता मोजण्यास सुरुवात केली. त्याला तरुण व काही महिलांनी विरोध केला. त्यामुळे तणाव वाढला. त्यानंतर कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड अधिक कुमक घेऊन आले. जमाव आक्रमक झाल्याने तसेच परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी जमावावर सौम्य लाठी हल्ला केला.
यासंदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदींसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रशांत खैरे यांची भेट घेऊन ग्रामस्थांवरील गुन्हे परत घ्यावे तसेच लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात हळदी समारंभ होत आहेत. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर आणि वाद्य वाजविले जातात. करावे येथे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या एक हळदी समारंभातील वाद्याच्या तीव्रतेचे ध्वनिमापक यंत्राद्वारे नोंद घेण्यात आली.
पोलिसांना विरोध करणाऱ्या जयेश रमेश भोईर, सुमित सुधाकर तांडेल, विशाल निवृत्ती तांडेल व बिपीन महादेव म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तर बेलापूर गावात अशाच प्रकारे ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी प्रथमेश बळीराम पाटील याच्यावरही गुन्हा दाखल केला.