पोलिसांची आडकाठी : राज ठाकरे यांची सभा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:00 AM2017-11-14T02:00:09+5:302017-11-14T02:00:27+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जागा देण्यास ठाणे पोलिसांनी नकार दिल्याने आता ठाण्यातही रस्त्यावर सभा घेण्याचे मनसेने निश्चित केले आहे.
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जागा देण्यास ठाणे पोलिसांनी नकार दिल्याने आता ठाण्यातही रस्त्यावर सभा घेण्याचे मनसेने निश्चित केले आहे. ठाणे स्टेशनलगत असलेल्या अशोक टॉकीज ते ग्रंथसंग्रहालय या दरम्यानच्या रस्त्यावर किंवा चिंतामणी चौकात शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी ही सभा होणार आहे. हा परिसर परप्रांतीय फेरीवाले, रिक्षावाल्यांसह व्यापाºयांचा बालेकिल्ला असल्याने याच ठिकाणी सभा घेण्याचा निर्धार मनसेने केला आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढून राज यांनी चर्चगेट स्टेशन परिसरात रस्त्यावर जाहीर सभा घेतली होती. त्याच धर्तीवर ठाण्यातही रस्त्यावर सभा होणार आहे. मागील आठवड्यात गुरुवारी राज ठाकरे यांनी ठाण्यातील पदाधिकाºयांची भेट घेतल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी ठाण्यात जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर, जागा निश्चित करण्याकरिता मनसे पदाधिकाºयांची धावपळ सुरू झाली. शहरातील निवडक जागा पाहिल्यानंतर परवानगीकरिता पोलिसांकडे अर्ज दिला असता परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आता सभा रस्त्यावर होणार आहे, असे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. सेंट्रल मैदान शांतता क्षेत्रामध्ये येत असल्याने या मैदानाची परवानगी नाकारण्यात आली. मनसे पदाधिकाºयांनी तलावपाळी आणि स्टेशन परिसरात सभेची परवानगी मागितली. परंतु, या ठिकाणांनाही पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे आता स्टेशन परिसरातील अशोक टॉकीजजवळ सभा घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, हा रस्ता वाहतुकीचा आणि वर्दळीचा असल्याने शनिवारी सायंकाळी ठाणेकरांची कोंडी होण्याची शक्यता आहे. अशोक टॉकीज परिसरातील कोंडीची समस्या पाहता चिंतामणी चौकात सभा घेण्यास पोलीस अनुकूलता दाखवण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्या सभेमुळे अशोक टॉकीज परिसरात कोणतीही वाहतूककोंडी होणार नाही. सार्वजनिक वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था आहे आणि आम्ही फक्त चार तास मागत आहोत. या परिसरातील दुकाने सभेच्या काळात बंद असतील, तर वाहतूककोंडी मुळीच होणार नाही. सार्वजनिक वाहने ही तलावपाळीमार्गे जाऊ शकतात.
-अविनाश जाधव, ठाणे शहराध्यक्ष, मनसे
अशोक टॉकीजला भोजपुरी चित्रपट प्रदर्शित होतात. त्यामुळे उत्तर भारतीयांची त्या ठिकाणी गर्दी असते.
अशोक टॉकीज स्टेशनजवळ आहे. फेरीवालामुक्त स्टेशन ही मनसेची मागणी आहे. ठाणे स्टेशन परिसर सध्या १०० टक्के फेरीवालामुक्त आहे. अशोक टॉकीज परिसरातील ४१ व्यापाºयांनी सभेच्या पाठिंब्यासाठी पत्र दिले आहे.