नंदुरबारात पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण
By admin | Published: September 6, 2016 08:19 PM2016-09-06T20:19:10+5:302016-09-06T20:19:10+5:30
दोन मंडळामध्ये नाचण्यावरून झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला तिघांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली.
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 6 - गणपती मिरवणुकीत दोन मंडळामध्ये नाचण्यावरून झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला तिघांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत उपनिरीक्षकाने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे.
नंदुरबार शहरात गेल्या काही दिवसात घडलेल्या तणावपूर्ण घटनांमुळे गणपती उत्सव शांततेत पार पाडवा यासाठी पोलीस प्रशासनान कंबर कसली आहे़ यासाठी ठिकठिकाणी सोमवारी पोलीस बंदोबस्त तैैनात करण्यात आला होता़ यातच मंगळ बाजारात जय हनुमान व्यायाम शाळेजवळ नाचण्याच्या क्षुल्लक कारणावरून जय हनुमान व्यायामशाळा आणि विर भगतसिंग मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.
प्रसंगी त्याठिकाणी बंदोबस्ताकामी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक यादव सखाराम भदाणे हे दोन्ही गटातला वाद मिटविण्यासाठी गेले़ यावेळी पोलीस उपनिरीक्षक भदाणे यांच्यासोबत संशयीत आरोपी विजय भिका मराठे उर्फ लल्ला, सचिन भिका मराठे आणि गणेश ईश्वर मराठे (रा. मंगळ बाजार परिसर मराठा गल्ली) यांनी हुज्जत घालत, शिवीगाळ करून मारहाण केली.
या घटनेनंतर सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत सोमवारी उपनिरीक्षक भदाणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सोमवारी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़