चोरांच्या अंधश्रद्धेस पोलिसांकडून ‘नाट’

By admin | Published: October 16, 2014 10:14 PM2014-10-16T22:14:45+5:302014-10-16T22:54:54+5:30

जिल्ह्यातील चित्र : अनेक ठिकाणी अमावास्येला होते नाकाबंदी

Police 'Superstition' | चोरांच्या अंधश्रद्धेस पोलिसांकडून ‘नाट’

चोरांच्या अंधश्रद्धेस पोलिसांकडून ‘नाट’

Next

सरूड : महाराष्ट्राची प्रतिमा पुरोगामी राज्य म्हणून आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर झाला. मात्र, तो पोलिसांपर्यंत अद्याप पोहोचलेलाच नसल्याचे चित्र आहे. म्हणून अमावास्याच्या आदल्या दिवशी व अमावास्येच्या दिवशी जागोजागी रस्त्यांवर पोलिसांची नाकाबंदी लागत असते. चोरांचा अंधश्रद्धेवर विश्वास असल्याने त्यांना ‘नाट’ लावण्यासाठी पोलिसांना दक्ष राहण्याचे सक्त आदेश वरिष्ठांकडून देण्यात येत असतात. अशा आदेशांमुळे एकप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणीच घातले जात आहे.संपूर्ण महाराष्ट्रात चोरांच्या जातीने अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला आहे की, जर अमावास्येच्या दिवशी चोरी केली आणि ती यशस्वी झाली तर वर्षभर चोऱ्या करण्यात यशस्वी होतो. पोलिसांच्या तावडीत सापडत नाहीत. विशेष म्हणजे, सोमवारच्या अमावास्येला प्रारंभ करण्याची चोरांची प्रथा असल्याचे सांगण्यात येते.
कोणतेही सत्कृत्य किंवा शुभकार्य करताना समाजात अमावास्या अशुभ मानली जाते. मात्र, चोरी, दरोड्यांसारखे दुष्कृत्य करण्यासाठी चोरांमध्ये अमावास्येचा मुहूर्त शुभ मानला जातो. म्हणून अमावास्येच्या आदल्या दिवशीच चोर आपले गाव सोडून दुसऱ्या गावाकडे, इच्छित ठिकाणी चोरी करण्यासाठी जात असतात. त्यामुळे अमावास्येच्या आधी व त्यादिवशी चोरांचीच वर्दळ गुप्तपणे सुरू असते. मात्र, याचवेळी कोणी विचारले, हटकले तर त्यांना ‘नाट’ लागते.
त्यामुळे ठरवलेल्या कामात म्हणजे चोरीच्या कामात व्यत्यय येतो, अडथळा येतो आणि ते अयशस्वी होतात, असा चोरांचा समज आहे. म्हणूनच चोरांना ‘नाट’ लावण्यासाठी हे दोनही दिवस पोलीस मंडळी डोळ्यात तेल घालून नाकाबंदी करून बंदोबस्त करतात.वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्वांनीच चोरांना ‘नाट’ लावणे उचित समजल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी बंदोबस्त करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. (वार्ताहर)

वाहनांची चौकशी
अमावास्येच्या आधी व त्यादिवशी दोन्ही दिवस पोलिसांचा ताफा गावाबाहेर नाकाबंदी करून येणाऱ्या, जाणाऱ्या संशयित वाहनांची व अनोळखी व्यक्तींची विचारपूस करत असतात. त्यामुळे चोरांना ‘नाट’ लागत असावा व ते चोरी करण्यास धजत नसावेत , असा पोलिसांचा समज आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा संमत होत असताना मात्र चोरांच्या अंधश्रद्धेला ‘नाट’ लावण्यासाठी पोलिसांना अमावास्येचा मुहूर्त साधावा लागतो, ही बाब मजेशीर आहे.

Web Title: Police 'Superstition'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.