शेतकऱ्यावर पोलिसांची दडपशाही

By admin | Published: March 25, 2017 12:37 AM2017-03-25T00:37:43+5:302017-03-25T00:37:43+5:30

औरंगाबाद जिल्ह्यातील घाटशेंद्रा येथील शेतकरी रामेश्वर हरीभाऊ भुसारे यांना मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण

Police Suppression on Farmers | शेतकऱ्यावर पोलिसांची दडपशाही

शेतकऱ्यावर पोलिसांची दडपशाही

Next

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील घाटशेंद्रा येथील शेतकरी रामेश्वर हरीभाऊ भुसारे यांना मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्यावर प्रचंड दडपशाही केल्याची बाब समोर आली आहे. या शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी त्याच्याविरूद्धच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याचे कळताच विरोधी पक्षनेत्यांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाणे गाठून पोलिस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
दोन वर्षापूर्वी झालेल्या गारपीटीत झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी शुक्रवारी मंत्रालयात आलेल्या रामेश्वर भुसारी या शेतकऱ्यास पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. मात्र, या घटनेबाबत पोलिसांकडून विरोधी पक्षनेत्यांना चुकीची माहिती दिली गेली. भुसारी यांना कोर्टात नेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्यांना मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात ठेवले होते. ही बाब लक्षात येताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, सपाचे नेते आ. अबू आसिम आझमी आदींनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे गाठले. पोलीस अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचे लक्षात येताच सर्वच नेते संतप्त झाले. नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
भुसारी यांचा जबाब नोंदविला
मी आत्महत्येचा प्रयत्न केलेला नसून, उलटपक्षी मंत्रालयात मारहाण झाल्यानंतर पोलिसांच्या वाहनातून पोलीस ठाण्यात आणले जात असताना गळ्यातील गमचा दोन्ही बाजुंनी ओढून माझाच गळा आवळण्याचा प्रयत्न झाला, अशी माहिती शेतकरी रामेश्वर भुसारी यांनी यावेळी दिली. विरोधी पक्षनेत्यांच्या दबावामुळे रामेश्वर भुसारी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यासंदर्भात पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला.
पोलिसांच्या व्हॅनमध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न-
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटण्यावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी वायरलेस व्हॅनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी भुसारेंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंत्रालयाच्या घटनेनंतर भुसारेंना पोलीस व्हॅनमधून नेत असताना त्याची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.
याच दरम्यान वायरलेस व्हॅनमध्ये असलेल्या दोरखंडाने त्यांनी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच अडविले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त मनोज शर्मा यांनी दिली. शेतकऱ्याची प्रकृति स्थिर असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Police Suppression on Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.