पोळने आणखी खून केल्याचा पोलिसांना संशय
By Admin | Published: August 26, 2016 03:14 AM2016-08-26T03:14:58+5:302016-08-26T03:14:58+5:30
सहा खून करणारा सिरियल किलर संतोष पोळने आणखी खून केल्याची शक्यता आहे.
वाई (जि. सातारा) : सहा खून करणारा सिरियल किलर संतोष पोळने आणखी खून केल्याची शक्यता आहे. तसेच आणखी सोने हस्तगत करणे, खुनासाठी वापरलेली दुचाकीही जप्त करायची असल्याने पोळला कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी गुरुवारी वाई न्यायालयात केली. पोलिसांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पोळला पुन्हा एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. तर ज्योती मांढरेला न्यायालयीन कोठडी सुनावली.
मंगल जेधे खून प्रकरणात पोळला न्यायालयाने १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ त्याची तसेच ज्योती मांढरे हिची पोलीस कोठडी संपल्याने वाईच्या न्यायालयात दोघांनाही हजर करण्यात आले होते. दरम्यान, ज्योती मांढरेच्या सह्याद्रीनगरमधील घरात पोलिसांनी गुरुवारी झडती घेतली. यावेळी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. याची माहिती मात्र पोलिसांनी गोपनिय ठेवली आहे. (वार्ताहर)
>मृतदेह उकरू नये, म्हणून कुत्र्यांनाही मारले
संतोषने सुरेखा चिकणे यांच्या खुनानंतर पंधरा ते वीस कुत्र्यांना विष देऊन मारल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. खून करून पुरलेला मृतदेह कुत्र्यांनी उकरून बाहेर काढू नये, यासाठी त्याने हे कृत्य केले होते, असे सांगितले जात आहे.
कुत्र्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असाही प्रश्न विचारला जात आहे. तसेच मृतदेह उकरला जावू नये म्हणून कुत्र्यांना मारणाऱ्या संतोष पोळवर नवा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्राणीमित्रांमधून होत आहे.
>वाईतही वकीलपत्र घेण्यास नकार
सातारा जिल्हा बार असोसिएशनने संतोष पोळचे वकील पत्र घेण्यास नकार दिल्यानंतर वाई येथील वकिलांनीही हीच भूमिका घेतली आहे.