भीक मागण्याची परवानगी मागणारा पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:43 AM2018-05-11T05:43:34+5:302018-05-11T05:43:34+5:30
पगार वेळेत न झाल्याने पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर अहिरराव यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे वर्तन खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
- जमीर काझी
मुंबई - पगार वेळेत न झाल्याने पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर अहिरराव यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे वर्तन खात्याची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
माहीम येथील पोलीस वसाहतीत जाऊन त्यांच्यावर कारवाईचा आदेश बजाविण्यात आला. अहिरराव हे मूळचे धुळे येथील असून, २००५ मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झाले. सध्या मरोळ सशस्त्र दलात नियुक्तीला असलेले व मातोश्री येथे बंदोबस्तावर असलेल्या अहिरराव यांनी ८ मे रोजी उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २० ते २३ मार्च दरम्यान पत्नीचा पाय फॅ्रक्चर असल्याने रजेवर होतो.
मात्र, पत्नीची प्रकृती खालावल्याने चार दिवस उशिरा २८ मार्चला कामावर हजर झालो. ५ दिवस गैरहजर राहिल्याने एप्रिल महिन्याचे वेतन काढले नाही. त्यामुळे कर्जाच्या हप्त्यावर अतिरिक्त दंड बसत आहे. पत्नीचा उपचार, मुलीच्या शाळेचे शुल्क, आई आणि वडिलांचा खर्च भागविण्यासाठी किमान गणवेशात भीक मागण्याची परवानगी द्यावी.
पोलीस खात्याची बदनामी
कॉन्स्टेबल अहिरराव यांनी आपल्या समस्येबाबत वरिष्ठांना माहिती न देता अर्ज करून तो प्रसार माध्यमापर्यंत पोहोचविला. व्हॉटस्अॅपवरून व्हायरल केला. त्यांचे कृत्य शिस्तभंग करणारे आहे. गणवेशाचा अपमान करणारे असल्याने प्राथमिक चौकशीला अधीन ठेवून त्यांना निलंबित केले आहे. - वसंत जाधव, पोलीस उपायुक्त, मरोळ सशस्त्र दल
तक्रार पूर्वीच केली होती
निलंबन करण्याची कारवाई अन्यायकारक आहे. माझे वेतन थकविल्याबाबत मी ७ मे रोजी नियंत्रण कक्षातील ‘समाधान’ हेल्पलाइनवर तक्रार नोंदविली होती. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक (प्रशासन) चिखले यांना फोन करून हा प्रकार सांगितला होता. अर्ज दिल्यानंतर ९ मे रोजी उपायुक्तांनी माझ्याकडून वेतनाबाबत अर्ज लिहून घेऊन वेतनही काढले. अर्जाची प्रत मी प्रसार माध्यमाकडे पोहोचविलेली नाही.
- ज्ञानेश्वर अहिररराव, निलंबित पोलीस कॉन्स्टेबल