पोलिसाला धमकी देणारे दाम्पत्य अटकेत
By admin | Published: December 22, 2015 02:32 AM2015-12-22T02:32:56+5:302015-12-22T02:32:56+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकातील पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी रविवारी अटक केली.
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकातील पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी रविवारी अटक केली. हे कऱ्हाड येथील दाम्पत्य आहे. सोमवारी त्यांना खडकी न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दाभोलकर हत्येचा तपास थांबविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना धमकी देण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली होती. चंद्रकांत दिनकर मोहिते (४१) आणि त्याची पत्नी संगीता (२५) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात खंडणी व जीवे मारण्याची धमकी देण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयला मदत करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सात अधिकाऱ्यांमध्ये घोडके यांचा समावेश आहे. खडकी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ डिसेंबरला त्यांना धमकीचा मेसेज आला. तपास थांबवावा, असे त्यात म्हटले होते. त्यानंतर ९ डिसेंबरला त्यांना पुन्हा एकदा मेसेज आला. त्यामध्ये, तपास थांबवा, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच घोडके यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणीही करण्यात आली होती.
१७ डिसेंबरला खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाइल क्रमांकाच्या आधारे कारवाई करण्यात आली.