Sanjay Raut: ईडीच्या वसुली रॅकेटची पोलीस करणार चौकशी; संजय राऊत यांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 07:07 AM2022-03-09T07:07:41+5:302022-03-09T07:07:56+5:30
शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत राऊत यांनी ईडीचे मुंबई व दिल्लीतील काही अधिकारी आपल्या वसुली एजंट मार्फत कोट्यवधींची वसुली करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्राप्तिकर विभाग आणि ईडीच्या माध्यमातून भाजपने चालविलेली भानामती शिवसेना उघड करेल. हा खंडणी उकळण्याचाच प्रकार असून या वसुली रॅकेट विरोधात मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली असून लवकरच ईडीचे काही अधिकारी तुरूंगात असतील, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी मंगळवारी केला.
शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत राऊत यांनी ईडीचे मुंबई व दिल्लीतील काही अधिकारी आपल्या वसुली एजंट मार्फत कोट्यवधींची वसुली करत आहेत. ईडीच्या माजी संचालकांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते आता भाजपच्या तिकिटावर लखनऊमधून निवडणुक लढवीत आहेत. भाजपच्या ५० उमेदवारांचा खर्च त्यांनी केल्याची चर्चा असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या खंडणीखोरीची संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे. २८ फेब्रुवारीला तेरा पानी पत्र पाठविले आहे, याकडे लक्ष वेधत मी पंतप्रधानांना आता फक्त एका भागाचीच माहिती दिली आहे. अशा दहा भागांची माहिती मी त्यांना देणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.
नवलानी वसुली एजंट
जितेंद्र चंद्रलाल नवलानी ही व्यक्ती ईडीच्या अधिकाऱ्यांसाठी वसुलीचे काम करतो, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. ईडीची कारवाई सुरू होताच नवलानींच्या कंपन्यांमध्ये कोट्यवधींची रक्कम जमा केली जाते. ज्या कंपन्या बँकेचे कर्जाचे पैसे देऊ शकत नाहीत त्या कंपन्या इडीची चौकशी सुरू होताच या खात्यांवर इतके पैसे का जमा करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.