पोलिसांनी केली दाभोलकरांच्या आत्म्याशीच (?) चर्चा
By admin | Published: July 7, 2014 02:47 PM2014-07-07T14:47:40+5:302014-07-07T19:26:02+5:30
अंधश्रद्धेविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अवघे आयुष्य वेचले असले तरी पुणे पोलिसांनी मात्र त्यांच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी चक्क तंत्र विद्येचाच आधार घेतला होता.
Next
ऑनलाइन टीम
पुणे, दि. ७- अंधश्रद्धेविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अवघे आयुष्य वेचले असले तरी पुणे पोलिसांनी मात्र त्यांच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी चक्क तंत्र विद्येचाच आधार घेतला होता अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हत्येच्या दोन महिन्यानंतर पुणे पोलिस आयुक्तांनी चक्क प्लॅन्चेट करुन दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा खटाटोप केल्याचा दावा एका मासिकाने केला आहे.
नरेंद्र दाभोलकरांची गेल्यावर्षी पुण्यात भररस्त्यात हत्या गोळ्या झाडून हत्या झाली होती. दाभोलकरांचे मारेकरी अद्याप सापडले नसून सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. दाभोलकरांच्या हत्येला १० महिने झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका मासिकाने पोलिसांची नाचक्की करणारे वृत्त दिले आहे. दाभोलकरांच्या हत्येचे गुढ उकलण्यासाठी तत्कालीन पुणे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी माजी सहाय्यक पोलिस आयुक्त रणजीत अभ्यंकर, निवृत्त कॉन्स्टेबल आणि मनिष ठाकूर नामक तांत्रिकाच्या मदतीने प्लॅन्चेट केले. हे सर्व तंत्रमंत्र पार पडले ते पुणे पोलिस आयुक्तालयाच्या मुख्यालयात. तंत्रविद्येद्वारे दाभोलकरांचा आत्म्याशीही पोळ आणि त्यांच्या सहका-यांनी संवाद साधला. त्यांच्या आत्म्याशी संवाद साधून हत्येच्या पूर्वीचा घटनाक्रम पोळ यांनी जाणून घेतल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दाभोळकरांच्या आत्म्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. मात्र यातून पोलिसांच्या हाती काहीच आले नाही असे या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान गुलाबराव पोळ यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचे सांगत वृत्त देणा-या सामाजिक कार्यकर्त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करु असे पोळ यांनी म्हटले आहे.