वृत्तपत्रविक्रेत्याच्या गाडीला पोलीस व्हॅनची धडक
By Admin | Published: January 18, 2017 02:27 AM2017-01-18T02:27:19+5:302017-01-18T02:27:19+5:30
मालवणीत एका वृत्तपत्रविक्रेत्याच्या गाडीला पोलीस व्हॅनने धडक दिल्याची घटना घडली
मुंबई : मालवणीत एका वृत्तपत्रविक्रेत्याच्या गाडीला पोलीस व्हॅनने धडक दिल्याची घटना घडली. पोलिसांच्या चुकीने हा अपघात घडल्याने त्यांनी याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्याकडून करण्यात येत आहे.
मालवणीच्या गेट क्रमांक ५ वर दिनकर चौधरी यांचा कित्येक वर्षे जुना पेपर स्टॉल आहे. याच परिसरात ते राहात असून, त्यांच्या घरासमोर एक अनधिकृत रिक्षा स्टँड आहे, ज्याची तक्रारदेखील त्यांनी मालवणी पोलिसांकडे केली आहे. सोमवारी दुपारी चौधरी यांचा मुलगा मनोहर याची कार त्यांच्या घरासमोरच उभी होती. त्या वेळी पोलिसांची एक व्हॅन या मार्गावरून जात असताना, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याच वेळी समोर असलेल्या पार्किंगच्या रिक्षा वाचविण्याच्या प्रयत्नात व्हॅनने मनोहर यांच्या कारला धडक दिली. त्या वेळी त्याचे वडील घटनास्थळी हजर होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यानंतर, संबंधित व्हॅन चालकाविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. महिनाभरापूर्वी घेतलेली मनोहरची कार ही सेकंड हँड असल्याने, याचे कागदपत्र अद्याप त्याच्या नावावर नाही. त्यामुळे त्याला विम्यासाठी अर्ज करता येणार नाही, असे सबंधित कंपनीने सांगितले. कारच्या दुरुस्तीसाठी दहा हजारांचा खर्च आहे. दरम्यान, आम्ही या प्रकरणी ट्रॅफिक डायरी तयार केली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)