नाशकात पोलीस कर्मचाऱ्याच्या खासगी वाहनाने तिघांना उडविले
By admin | Published: June 14, 2016 05:19 PM2016-06-14T17:19:49+5:302016-06-14T17:19:49+5:30
शहरातील टिळकवाडी सिग्नल तोडून एका पोलीस कर्मचाऱ्याच्या खासगी वाहनाने दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली़ यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १४ : शहरातील टिळकवाडी सिग्नल तोडून एका पोलीस कर्मचाऱ्याच्या खासगी वाहनाने दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली़ यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून दोघे किरकोळ जखमी झाले़ या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान हा पोलीस कर्मचारी मद्यधुंद असल्याचे वृत्त आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास टिळकवाडी सिग्नलवरील बाफणा ज्वेलर्स दुकानाशेजारी वाहनधारक सिग्नल सुटण्याच्या प्रतीक्षेत उभे होते़ त्यावेळी पाठिमागून भरधाव आलेल्या स्विफ्ट कारने (एमएच ०६, सीबी ८२०३) सिग्नलवरील स्कूटर (एमएच १५, एएफ ८९०३) व एका मोटारसायकलला धडक दिली़ ही कार व पोलीस कर्मचारी अर्जुन विठ्ठल आघाव हा चालवित होता़ या धडकेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी पंडीत कॉलनीतील सुश्रृत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत़ तर उर्वरित दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत़
पोलीस कर्मचारीच वाहतूकीचे नियम न पाळता भरधाव वाहने चालवित असतील सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा करणार असा सवाल उपस्थित नागरिकांकडून केला जात होता़ या अपघातानंतर सिग्नलवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती़ कारचालक पोलीस कर्मचारी आघाववर सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.