पोलिसांना हवी चौघांची कोठडी
By admin | Published: December 3, 2015 12:50 AM2015-12-03T00:50:23+5:302015-12-03T00:50:23+5:30
सुरज परमार आत्महत्या प्रकरणात शनिवारी पोलिसांपुढे हजर होणाऱ्या नगरसेवकांचे आर्थिक व्यवहार तपासण्याकरिता त्यांची पोलीस कोठडी मिळविण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
ठाणे : सुरज परमार आत्महत्या प्रकरणात शनिवारी पोलिसांपुढे हजर होणाऱ्या नगरसेवकांचे आर्थिक व्यवहार तपासण्याकरिता त्यांची पोलीस कोठडी मिळविण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. तर दुसरीकडे हे चारही जण व्यावसायिक असल्याने त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट हे त्यांच्या खात्यात आलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशेब पोलिसांना सादर करण्याची तयारी करीत आहेत.
परमार प्रकरणात सुसाइड नोटमध्ये या चौघांची नावे लिहून खोडलेली होती. मात्र, पोलिसांनी या चारही जणांच्या बँक अकाउंटचा तपशील काढून मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केल्याने उच्च न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले व त्यांना पोलिसांना शरण येण्यास सांगितले.
त्यामुळे आता या चारही नगरसेवकांची पोलीस कोठडी मागून रकमांच्या उलाढालीची उकल करून आपली बाजू मजबूत करणे, ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्याच वेळी राजकारणाबरोबर खासगी व्यवसाय करणाऱ्या या चार नगरसेवकांचे सीए कामाला लागले आहेत. हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला यांची बांधकाम व्यवसायातही ‘गुंतवणूक’ आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देताना सीएचा कस लागणार आहे.
चौघांचीही बँक खाती तसेच त्यांचे व्यवहार आणि साक्षीदार यांची तपासणी करण्यासाठी चौघांची पोलीस कोठडी हवी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांच्या खात्यात कोणत्या कारणास्तव पैसे आले, ते कुणाकडून आले, याचा अंदाज पोलिसांनी घेतला आहे. मात्र, आता कोठडीत त्यांना बोलते केल्यावर त्याला सबळ पुरावे प्राप्त होतील आणि परमार आत्महत्येचा दावा न्यायालयात सबळपणे उभा करणे पोलिसांना शक्य होईल.
सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण आणि पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून चौघांची चौकशी केली जाणार आहे.
नजीब मुल्ला यांच्या बँक खात्यातून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात वळते झालेल्या सुमारे एक कोटी रुपयांबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी आणखी चौकशी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ( प्रतिनिधी )