पोलीसही करणार योगासने
By admin | Published: June 20, 2016 03:58 AM2016-06-20T03:58:02+5:302016-06-20T03:58:02+5:30
राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असणाऱ्या सव्वा दोन लाखांवरील खाकी वर्दीवाल्यांपैकी बहुतांश जण मंगळवारी कपालभाती
जमीर काझी, मुंबई
राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असणाऱ्या सव्वा दोन लाखांवरील खाकी वर्दीवाल्यांपैकी बहुतांश जण मंगळवारी कपालभाती, अनुलोम-विलोमचे धडे घेताना पाहावयास मिळणार आहेत. या योगसाधनेचा मुहूर्त जुळून आला आहे, तो ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या निमित्ताने. २१ जूनला साजऱ्या होणाऱ्या या दिनानिमित्य राज्यातील सर्व पोलीस विभागांत योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षक व अन्य घटक प्रमुखांना त्याबाबत आदेश दिले आहेत.
ओम योगविद्या गुरुकुल संस्थेमार्फत कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे. जास्ती जास्त अधिकारी-कर्मचारी त्यामध्ये सहभागी
होतील, या दृष्टीने प्रशिक्षण शिबिराचे ठिकाण व वेळेची निश्चिती करावयाची आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात मानवाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ हरवून जात आहे. त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारतीय संस्कृतीचे एक प्रतीक असलेल्या योग साधनेकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. २१ जून रोजी जगभरात ‘योग दिन’ साजरा केला जात आहे. त्या निमित्त योगासनाचे मानवी जीवनातील महत्त्व व गरज विषद केली जात आहे. पोलिसांना बंदोबस्तामुळे ताण-तणावाखाली वावरावे लागते. त्यामुळे निरोगी राहाण्यासाठी पोलिसांनाही नियमित व्यायाम व योगासने करणे अत्यावश्यक बनले आहे. त्याबाबत अधिक जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जागतिक योग दिनी अधिकाधिक योग शिबिर घेण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. त्यासाठी राज्यातील सर्व पोलीस विभागांत तो राबविला जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण वर्ग चालविणाऱ्या ओम योग गुरुकुलचे सहकार्य घेतले जाणार आहे. संस्थेचे राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये, तसेच प्रमुख शहरांमध्ये शाखा व पदाधिकारी आहेत. घटकप्रमुख त्याच्याशी संपर्क साधून योग वर्गाचे नियोजन करणार आहेत. या वेळी योग प्रशिक्षक महत्त्वाचे योग व त्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. मोठे क्रीडांगण किंवा पाऊस असल्यास बंदिस्त सभागृहामध्ये हा वर्ग घेतला जाईल. त्यामध्ये जास्तीत जास्त अधिकारी व अंमलदारानी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना दीक्षित यांनी केली आहे. त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल २७ जूनपर्यंत पोलीस मुख्यालयात पाठवावयाचा आहे.