फरार आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसालाच केले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 05:49 AM2018-11-27T05:49:56+5:302018-11-27T05:50:07+5:30
मारेगाव (यवतमाळ) : दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर आरोपी व त्याच्या कुटुंबीयांनी अचानक हल्ला चढविला. ...
मारेगाव (यवतमाळ) : दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर आरोपी व त्याच्या कुटुंबीयांनी अचानक हल्ला चढविला. त्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक ठार झाला असून अन्य दोन पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ही घटना मारेगाव तालुक्यातील हिवरी या गावात रविवारी मध्यरात्री घडली.
राजेंद्र कुडमेथे (५०) असे मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर जमादार मधुकर मुके (४५) व पोलीस शिपाई प्रमोद फुफरे (३०) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वणी येथे उपचार सुरू आहेत. आरोपी अनिल मेश्राम (३५) हल्ल्यानंतर पसार झाला. मारेगाव पोलिसांनी या प्रकरणी खून व शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हे नोंदविले असून हल्ल्यासाठी मदत करणारी आरोपीची आई इंदिरा मेश्राम (६०) हिला ताब्यात घेतले आहे.
हिवरी येथील एका महिलेला रॉडने मारून गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात आरोपी अनिलविरुद्ध ३२४, ४५२ च्या कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. गेल्या दोन वर्षापासून तो फरार होता. त्याला पकडण्यास पोलीस गेले होते.