पोलिसाचे कुटुंबच झाले होत्याचे नव्हते
By admin | Published: August 4, 2014 03:19 AM2014-08-04T03:19:52+5:302014-08-04T03:19:52+5:30
माळीण गावामध्ये झालेल्या दुर्घटनेत पुणे शहर पोलीस दलातील निवृत्ती विठ्ठल झांजरे या हवालदाराचे संपूर्ण कुटुंबच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले
पुणे : माळीण गावामध्ये झालेल्या दुर्घटनेत पुणे शहर पोलीस दलातील निवृत्ती विठ्ठल झांजरे या हवालदाराचे संपूर्ण कुटुंबच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आई, तीन भाऊ, भावजया, त्यांची मुले, सुना आणि नातवंडे असे १९ जणांचे कटुंब काळाने हिरावून नेले. ढिगाऱ्याखालून त्यांच्या काही नातेवाइकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर काहींसाठी शोध सुरू आहे.
आयुक्तालयातील विशेष शाखेमध्ये कार्यरत निवृत्ती झांजरे यांना ३० जुलै रोजी सकाळीच माळीण दुर्घटनेची माहिती मिळाली. वरिष्ठांची परवानगी घेऊन झांजरे गावाकडे रवाना झाले. निवृत्ती झांजरे यांचे आई हौसाबाई, थोरले भाऊ श्रावण, त्यांच्या पत्नी सीताबाई, सून सविता आणि तीन वर्षांची नात हे राहात होते. त्यांच्या शेजारीच त्यांचे धाकटे बंधू गोविंद, त्यांची पत्नी रोहीबाई, मुलगा संदीप, सून नीना आणि अवघ्या दीड वर्षाचं बाळ सुयश राहत होते. लागून असलेल्या घरामध्ये राहणारे तिसरे बंधू गेणुभाऊ, त्यांची पत्नी देऊबाई, मुलगा मंगेश, सून नंदा त्यांच्या तीन मुली, यासोबतच त्यांचा दुसरा मुलगा रवी, पत्नी मनीषा आणि मुलगी ईश्वरी हे सर्व जण या दुर्घटनेचे बळी ठरले.
श्रावण हे एका खासगी कंपनीमधून निवृत्त झालेले होते. त्यांची तीनही मुले पुण्यात राहतात. येथेच नोकरीला आहेत. यापैकी दुसरा मुलगा सखाराम याची पत्नी तीन वर्षांच्या मुलीला घेऊन शेतीच्या कामामध्ये मदत करण्यासाठी माळीणला आली होती. त्यांच्यावरही काळाने घाला घातला. गोविंद यांचा मुलगा संदीप हा मलेरिया सर्व्हेलन्स म्हणून काम करीत होता. गेणुभाऊ हे गावामध्ये राहूनच शेती करीत होते. त्यांची मुले मंगेश आणि रवी त्यांना शेतीच्या कामात मदत करत होते, अशी माहिती निवृत्ती झांजरे यांच्या पत्नी कल्पना यांनी दिली.