वरिष्ठाची हत्या करून पोलिसाची आत्महत्या
By admin | Published: May 3, 2015 06:08 AM2015-05-03T06:08:25+5:302015-05-03T06:08:25+5:30
वाकोला पोलीस ठाण्याच्या साहाय्यक फौजदाराने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांच्या वायरलेस आॅपरेटर शिपायावर गोळ्या झाडल्या
मुंबई : वाकोला पोलीस ठाण्याच्या साहाय्यक फौजदाराने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून वरिष्ठ निरीक्षक आणि त्यांच्या वायरलेस आॅपरेटर शिपायावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. दरम्यान, या गोळीबारात वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांचेही इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झाले.
ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास पोलीस ठाण्यातच घडली. गोळीबार करणाऱ्या साहाय्यक फौजदाराचे नाव दिलीप शिर्के आहे. स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने त्यांचा मृत्यू व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करून घेण्याआधीच झाला. वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी आणि त्यांचा वायरलेस आॅपरेटर बाळासाहेब अहिरे या दोघांना लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, जोशी यांच्या पाठीत शिरलेली गोळी यकृताला छेदत पोटातून बाहेर पडली. त्यामुळे रात्री उशिरा विलास जोशी यांचे निधन झाले. अहिरे यांच्या मांडीत गोळी घुसली आहे. या घटनेने सुन्न झालेल्या वाकोला पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा सुरू होता.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. शिर्के यांनी हे पाऊल का उचलले, त्यांना याआधी वरिष्ठ निरीक्षक जोशी किंवा अन्य वरिष्ठांकडून जाच होता का, याबाबत गुन्हे शाखा तपास करणार आहे. शिर्के यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून (९एमएम) तीन गोळया झाडल्या. हे रिव्हॉल्वर पुढील तपासासाठी हस्तगत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)