कौटुंबिक वादातून पोलिसाचे हात तोडले
By admin | Published: October 1, 2016 01:16 AM2016-10-01T01:16:16+5:302016-10-01T01:16:16+5:30
कौटुंबिक वादातून काका, चुलतभाऊ आणि अन्य नातेवाइकांनी हर्सूल कारागृहात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचे दोन्ही हात तोडल्याची
औरंगाबाद : कौटुंबिक वादातून काका, चुलतभाऊ आणि अन्य नातेवाइकांनी हर्सूल कारागृहात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचे दोन्ही हात तोडल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री हर्सूल टोल नाक्याजवळ घडली. गंभीर जखमी असलेल्या पोलिसावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रकाश रामलाल बमणे असे जखमी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याविषयी हर्सूल ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण चाबूकस्वार म्हणाले, प्रकाश बमणे हे मंगळवारी रात्री हर्सूल रोडवरील ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपल्यानंतर मोटारसायकलने घरी जात असताना हर्सूल टोलनाक्याजवळ दोन जणांनी त्यांना हात दाखवून थांबविले. यात त्यांचा एक चुलतभाऊ होता. त्यांना पाहून बमणे यांनी दुचाकी उभी करताच दोन दुचाकीवरून आलेल्या चार नातेवाइकांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. तेथून जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर पळाले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश बमणे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. यात प्रकाश यांचा उजवा हात खांद्यापासून तुटला असून डाव्या हाताची हाडे मोडली आहेत. पोलिसांनी शुक्रवारी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)