राजकीय पक्षांच्या प्रचारातील ध्वनीवर पोलिसांचे लक्ष
By Admin | Published: February 18, 2017 01:23 PM2017-02-18T13:23:31+5:302017-02-18T13:23:31+5:30
राजकीय पक्षांच्या प्रचारातील ध्वनीवर पोलिसांचे लक्ष
राजकीय पक्षांच्या प्रचारातील ध्वनीवर पोलिसांचे लक्ष
सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने जोर धरला आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार सुरू करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीतील ध्वनिक्षेपकाचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले.
सोलापूर महानगरपालिकेत प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवित आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाने ध्वनीचे उल्लंघन केले नसल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सांगण्यात आले. येणाऱ्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांच्या सभा सोलापुरात होणार आहेत. शहरात बहुरंगी लढत होत असल्याने सभेत ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. शहरात जयंती व मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाचे अकरा खटले दाखल होते. त्यावेळी पोलिसांनी खटले दाखल करुन ध्वनीचे साहित्य जप्त केले होते. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात पाच, जोडभावीपेठ व सदर बझार पोलीस ठाणे प्रत्येकी तीन असे अकरा गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलीस आयुक्त सुभाष नेवे यांनी सांगितले.
-----------------------
पोलीस ठाणेनिहाय ध्वनिमापक यंत्रे
फौजदार चावडी पोलीस ठाणे: १५
जेलरोड पोलीस ठाणे: १५
सदर बझार पोलीस ठाणे: १४
जोडभावीपेठ पोलीस ठाणे: १५
विजापूर नाका पोलीस ठाणे: ०४
एमआयडीसी पोलीस ठाणे: ०६
एकूण: ७४
--------------------
पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती
शहरातील राजकीय पक्षांच्या सभेतील विशिष्ट अंतरावरुन आवाज मोजण्याची जबाबदारी ही संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची आहे. जर ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन झाले असेल तर संबंधित पक्षावर ध्वनिप्रदूषण अंतर्गत कायद्यान्वये पुढील कार्यवाही करण्यात येते.
------------------------
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करा
पोलीस ठाणे व प्रभारी अधिकारी जर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल किंवा तक्रारीस प्रतिसाद मिळत नसेल तर त्यांनी पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्त यांच्याक डे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------
विद्यार्थ्यांना निवडणुकीचा त्रास
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. जाहिरात फलकांबरोबरच वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती, पथनाट्य व लाऊडस्पीकरवरून जाहिरातींचा यात समावेश आहे. प्रामुख्याने ज्या भागात शैक्षणिक संस्था आहेत, त्या परिसरातून लाऊडस्पीकरवरून करण्यात येणाऱ्या प्रचारामुळे वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.