पोलिसांचे सीबीआयला असहकार्य
By admin | Published: July 27, 2015 12:39 AM2015-07-27T00:39:53+5:302015-07-27T00:39:53+5:30
नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचा तपास सीबीआयकडे देऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र राज्य
लातूर : नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचा तपास सीबीआयकडे देऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र राज्य पोलिसांचे त्यांना सहकार्य मिळत नसल्याने तपासात प्रगती झालेली नाही, असा खळबळजनक आरोप डॉ. हमीद दाभोळकर यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत केला.
केंद्र व राज्य शासन गांभीर्याने हा तपास करीत नाहीत, असे ते म्हणाले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या अभियानाची सुरुवात रविवारी येथे झाली.
दाभोळकर म्हणाले, सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याची गेल्या सहा महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. शिवाय, सीबीआयचे कार्यालय बेलापूरमध्ये आणि गुन्हा घडल्याचे ठिकाण पुणे आहे. त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळही नाही. दाभोळकरांच्या कुटुंबियांना तपासाबाबत माहिती दिली जात नाही. त्याचा निषेध म्हणून ‘नरेंद्र दाभोलकर के हत्यारों को कब पकडा जाएगा’ या आशयाचे एक लाख पत्र राष्ट्रपतींना पाठविले जाणार आहे.
दाभोळकर, अॅड. गोविंद पानसरे यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी व तपासाचा पाठपुरावा करण्यासाठी ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ प्रबोधन अभियानाची सुरुवात येथे झाली. ७, ८ व ९ आॅगस्टला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम होणार आहे. त्यात विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद होणार असून, जात पंचायत मुक्तीच्या कायद्याला राज्य शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणीही केली जाणार असल्याचे डॉ. दाभोळकर व माधव बावगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)