पोलिसांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ लातुरात पोलिसांच्या कुटुंबीयांचा मोर्चा
By admin | Published: September 7, 2016 10:34 PM2016-09-07T22:34:18+5:302016-09-07T22:34:18+5:30
लातुरात बुधवारी दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावरुन जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 7 - मुंबईतील पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांच्यासह यांच्यासह पोलिसांवरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ लातुरात बुधवारी दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावरुन जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसह विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, पोलिस मित्रांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
मुंबईतील वाहतूक शाखेत काम करणारे पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ श्री गणेश वेल्फेअर सोसायटी, पोलिस मित्र, पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीने लातुरात बुधवारी निषेध मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मोठ्या प्रमाणावर विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत मोर्चात कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा मूकमोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावरुन या मोर्चाला प्रारंभ झाला. काळ््या फिती लावून कुटुंबियांनी पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध नोंदविला. ५.३० वाजता जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर श्री गणेश वेल्फेअर सोसायटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीस विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटना, पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा सहभाग होता. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, एन.डी. उबाळे, सुनिल ओहळ, सुधाकर बावकर यांच्यासह पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर होते.