थर्टी फर्स्टसाठी कोल्हापुरात पोलिसांची ‘झाडाझडती’ सुरू
By Admin | Published: December 28, 2016 08:14 PM2016-12-28T20:14:18+5:302016-12-28T20:14:18+5:30
‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हॉटेल, लॉजची झाडाझडती घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बुधवारी दिले.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 28 - ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हॉटेल, लॉजची झाडाझडती घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बुधवारी दिले. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजची तपासणी बुधवारपासून तीन दिवस सुरू राहणार आहे. नाकाबंदीसह वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमारेषांवर नाकाबंदीसह वाहनांची कसून तपासणी सुरू ठेवली आहे. पोलीस व उत्पादन शुल्क विभागातर्फे संयुक्त कारवाईची मोहीम सुरू आहे.
‘थर्टी फर्स्ट’दिवशी उत्साही तरुण मद्यप्राशन करून सुसाट वेगाने वाहने चालवीत मोठमोठ्याने ओरडत जात असतात. अशा वेळी अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर काही हॉटेल्समध्ये आॅर्केस्ट्रा व डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्य करीत असताना महिलांची किंवा तरुणींची छेडछाड होऊन जल्लोषाला गालबोट लागू शकते. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बुधवारी शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील वाहतूक व्यवस्थेसह सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना देत हॉटेल व रिसॉर्टची झाडाझडती घेण्याचे त्यांनी आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार गोपनीय विभाग तपासणी करून संबंधित मालकांना नोटिसा देत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्याची तस्करी होत असते. गोव्याहून देशी-विदेशी मद्याचा साठा जिल्ह्यात आणण्यासाठी छोटे-मोठे व्यावसायिक छुप्या मार्गाने तस्करी करीत आहेत. शहरालगतच्या उपनगरांसह ग्रामीण भागातील गावठी हातभट्ट्यांवर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले. त्यासाठी बुधवारी रात्रीपासून चार दिवस नाकाबंदी सुरू राहणार आहे.
शंभर वाहनचालकांना दंड
शहरात सीपीआर, कावळा नाका चौकांत शहर वाहतूक शाखेने झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबविणाऱ्या शंभर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. रस्त्यांवरील चौकांत चार पट्टे मारलेले आहेत. हा मार्ग पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आहे. वाहनधारक सिग्नलला थांबताना याच पट्ट्यावर गाडी थांबवून नियमांचे उल्लंघन करतात. अशा वाहनधारकांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड भरून घेण्यात आला. वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.