राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली, मात्र त्यावर कृती काहीच नाही; शरद पवारांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 06:45 PM2023-06-08T18:45:22+5:302023-06-08T18:46:32+5:30
शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.
राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला तर हे महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. याठिकाणच्या सर्वसामान्य लोकांची कायदा हाती घेण्याची प्रवृत्ती नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले. कोणीतरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही आवाहन आहे की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार घडू नयेत, असं शरद पवार म्हणाले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.
शासकीय यंत्रणा विशेषतः पोलिस यंत्रणा जी पावले टाकते त्या यंत्रणेला सर्वसामान्य माणसांनी सहकार्य द्यायची गरज आहे. आपण सर्वांनी यंत्रणेला सहकार्य केले तर परिस्थिती तातडीने बदलली असे चित्र आपल्याला बघायला मिळेल. कोल्हापूर शहर अथवा अन्य शहरांना सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी शांतता निर्माण केलीच पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, ताराराणींचा आदर्श ठेवून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली पाहिजे. काही लोक चुकीचे वागत असतील पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर, राज्य शासनाने सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर ही स्थिती बदलेल, शांतता प्रस्थापित होईल आणि त्याला सर्वांनी साथ द्यावी, असं आवाहन देखील शरद पवारांनी केलं.
दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांसाठी धोरणे जाहीर केली गेली, मात्र त्यावर कृती दिसत नाही. काल विदर्भात असताना एक गोष्ट लक्षात आली. मागील अतिवृष्टी आणि गारपिटीसाठी जी नुकसान भरपाई जाहीर झाली ती अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. ही चांगली गोष्ट नाही. शेवटी काळ्या आईशी जो ईमान राखतो, लोकांच्या भुकेचा जो प्रश्न सोडवतो त्याला संकटाच्या काळात शासनाने मदत केली पाहिजे. बळीराजाचा हा आग्रह काही चुकीचा नाही, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.