नक्षलग्रस्त भागात हेलिकॉप्टरने पोहोचविल्या पोलिंग पार्ट्या

By admin | Published: October 15, 2014 01:36 AM2014-10-15T01:36:10+5:302014-10-15T01:36:10+5:30

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात उद्या १५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी

Poling parties delivered by helicopter in Naxal areas | नक्षलग्रस्त भागात हेलिकॉप्टरने पोहोचविल्या पोलिंग पार्ट्या

नक्षलग्रस्त भागात हेलिकॉप्टरने पोहोचविल्या पोलिंग पार्ट्या

Next

कडेकोट पोलीस बंदोबस्त : तीन मतदार संघात २०९ अतिसंवेदनशील मतदान केंद्र
गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात उद्या १५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून तीन विधानसभा क्षेत्रात ७३६ मतदान केंद्र राहणार आहेत. यापैकी २०९ मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आहेत. सोमवारपासूनच मतदान केंद्रावर पोलिंग पार्ट्या नेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र ढगाळ वातावरण व पाऊसामुळे या कामात व्यत्यय आला. आज गडचिरोली, अहेरी व देसाईगंज मुख्यालयातून पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आल्या.
अहेरी विधानसभा मतदार संघात दुर्गम गावातील मतदान केंद्रापर्यंत पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याचे काम हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आले आहे. मतदानाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलीस दलाचे सी-६० पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहे. तीन विधानसभा मतदार संघात ७ लाख ३१ हजार १०५ मतदार असून यामध्ये ३ लाख ७६ हजार ५० पुरूष व ३ लाख ५५ हजार ५५ महिला मतदार आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रात २२३, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात २४७ व अहेरी विधानसभा मतदार संघात २६६ मतदान केंद्र राहणार आहेत.
निवडणुकीच्या कामासाठी ४ हजार ५०० कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. संवेदनशील भागातील ४६ मतदान केंद्र इतरत्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार हलविण्यात आले आहे. यामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रात ७, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ६ व अहेरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ३३ मतदान केंद्रात फेरबदल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली विधानसभा मतदार संघात जवळजवळ २५ गावांनी पेसा कायदा लागू झाल्याच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेतला आहे. आज राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या, खासगी वाहने, शासकीय वाहने तसेच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पोलिंग पार्ट्या व सुरक्षा जवानांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात आले. संवेदनशील भागातील मतदान केंद्राची श्वान पथकाद्वारे तपासणी करून तसेच पोलिंग पार्ट्या जाण्यापूर्वी मार्गाचीही रोड ओपनिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Poling parties delivered by helicopter in Naxal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.