भिवंडी मनपा निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले; रोड नही तो वोट नही, शहरात लागले बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 04:01 PM2021-11-10T16:01:01+5:302021-11-10T16:02:09+5:30
भिवंडी महापालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची समस्या गंभीर झाली असून खड्डेमय रस्त्यांवरून आता राजकारणास सुरुवात झाली आहे.
नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडी महापालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची समस्या गंभीर झाली असून खड्डेमय रस्त्यांवरून आता राजकारणास सुरुवात झाली आहे . भिवंडी मनपाची आगामी निवडणूक लक्षात घेता शहरातील राजकीय वाटेवरून तापी लागले आहे . मागील सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांच्या काळात रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्याने शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप शहरातील नागरिकांकडून होत असतानाच आता '' रोड नही तो, वोट नही '' अशा आशयाचे बॅनर शहरात लागण्यास सुरुवात झरी झाली असून या बॅनर बाजीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातील शांतीनगर - गैबी नगर या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने रिक्षा चालकांसह प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत . मनपा प्रशासनाकडून मागील अनेक महिन्यांपासून या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नसल्याने या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत . या मार्गाच्या दुरावस्थेकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष जावे यासाठी शांतीनगर येथील मौलाना आझाद रोड वर हिना मार्केट जवळ '' रोड नही तो, वोट नही '' या आशयाचा बॅनर लागला असल्याने या बॅनरची सध्या संपूर्ण शहरात चर्चा रंगली आहे . दुसरीकडे मनपा निवडणुकीत शहरातील रस्त्यांचा मुद्दा उपस्थित होणार असल्याचे लक्षात आल्याने मनपा प्रशासनाकडून रस्त्यांच्या तात्पुरता डागडुजीचे काम हाती घेतले जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात असून वारंवार तात्पुरता दुरुस्ती करून रस्त्यांच्या डागडुजी वर मनपा प्रशासन लाखोंची उधळण करत असल्याने या रस्ता दुरुस्ती कामांची चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.