सरसंघचालक-गडकरी भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 12:39 AM2019-11-07T00:39:35+5:302019-11-07T00:41:16+5:30
गुरुवारी नागपुरात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यांच्या या भेटीत काय चर्चा होते, ते कार्यक्रमात काय भाष्य करतात व सत्तास्थापनेकडे एक पाऊल पुढे जाते का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. राज्यात बैठकांचा जोर सुरू असताना गुरुवारी नागपुरात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यांच्या या भेटीत काय चर्चा होते, ते कार्यक्रमात काय भाष्य करतात व सत्तास्थापनेकडे एक पाऊल पुढे जाते का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली व डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेची भूमिका, सत्तास्थापनेतील अडथळे, भविष्यातील अडथळे यावर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा झाली. यानंतरदेखील बुधवारी नेमके ठोस काही समोर आले नाही. त्यामुळे भागवत व गडकरी काय चर्चा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिव्हाळा संस्थेतर्फे नागपुरातील सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला दोघेही उपस्थित राहणार आहेत. येथे दोघांची भेट तर होईलच. शिवाय गडकरी हे सकाळी नागपुरात येत असून दिवसभरात ते संघ पदाधिकाऱ्यांशी भेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच ते भाजपच्या नेत्यांशीदेखील चर्चा करु शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.