शिवजयंतीनिमित्तानं भगवा झेंडा लावण्यावरुन झालेल्या वादास राजकीय रंग
By Admin | Published: February 22, 2016 04:29 PM2016-02-22T16:29:33+5:302016-02-22T16:58:22+5:30
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील वादग्रस्त जागेवर भगवा ध्वज लावण्यास विरोध केल्याने पोलिसांवर हल्ला झाल्याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. २२ - रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील वादग्रस्त जागेवर भगवा ध्वज लावण्यास विरोध केल्याने पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे. शिवजयंतीनिमित्तानं १८ तारखेला भगवा झेंडा लावण्यावरुन काही तरुण आणि पोलिसांत झालेल्या मारहाणी प्रकरणाला आज वेगळे वळण मिळाले आहे.
एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी यांच्या प्रक्षोभक ट्विटनंतर आज आमदार इम्तियाज जलील यांनी लातुरमध्ये मोर्चा काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक स्वरुप प्राप्त झाले आहे.
प्रकरण काय आहे -
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी रात्री पानगाव येथील वादग्रस्त जागेवर जयंती उत्सव समितीचे काही कार्यकर्ते ध्वज लावण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकार्याने विरोध केला.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी या अधिकार्यास जमावाकडून जबर मारहाण झाली. या प्रकरणी रेणापूर ठाण्यात १२५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करुन १२ जणांना अटक करण्यात आली होती. रविवारी आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पानगावात शांतता रहावी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रेणापूर पोलिसांचे पथक अन्य आरोपींचा शोध घेत आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.