शिंदे सरकार म्हणजे गंमत-जंमत सरकार कसे...?

By अतुल कुलकर्णी | Published: August 13, 2023 10:41 AM2023-08-13T10:41:17+5:302023-08-13T10:43:56+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार म्हणजे गंमत-जंमत सरकार आहे, असे म्हणून तुम्ही गंमतच केली आहे.

political consequences after nana patole criticized shinde govt | शिंदे सरकार म्हणजे गंमत-जंमत सरकार कसे...?

शिंदे सरकार म्हणजे गंमत-जंमत सरकार कसे...?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

प्रिय नानाभाऊ, 

नमस्कार,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार म्हणजे गंमत-जंमत सरकार आहे, असे म्हणून तुम्ही गंमतच केली आहे. असे कसे म्हणता? एका मंत्र्याकडे ६ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद, ३६ जिल्ह्यांना १९ पालकमंत्री आणि १७ जिल्ह्यांना पालकमंत्रीच नाहीत म्हणजे गंमत-जंमत म्हणायचे का...? सरकार किती काम करीत आहे. तरीही आपण सरकारवर टीका करीत आहात. बरोबर नाही. तुमच्या आजूबाजूचे लोक सतत मुख्यमंत्री आणि अजितदादा यांच्यात भांडणं लावण्याचे काम करीत आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण बरोबर नाही. मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले हे काही वर्षे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव होते. त्यांना ‘ईडी’ने नोटीस दिली, म्हणजे त्याचा थेट मुख्यमंत्र्यांशी संबंध कसा काय येतो? पण, आपले लोक तो संबंध लावतात, हे बरोबर नाही. अजित पवार ठाण्यामध्ये गेले. त्यांनी त्यांच्या पक्षकार्यालयाचे उद्घाटन केले. तिथे बोलताना त्यांनी ठाण्यात आपल्याला नवी क्रांती करायची आहे, असे सांगितले. याचा अर्थ ठाण्यात राष्ट्रवादीच्या जागा वाढतील. शिंदे गटाच्या कमी होतील. राष्ट्रवादी, भाजप एकत्र सरकार बनवेल... याला काही अर्थ आहे का...?

मुख्यमंत्री शिंदे यांचे दिल्ली दरबारी महत्त्व राहिले नाही, असे तुम्ही सांगितल्याची चर्चा आहे. तुमचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले आहे, असे जर कोणी सांगितले तर तुम्हाला आवडेल का..? अजित पवार यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटची मीटिंग घेतली. हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात..! त्यांना न सांगता अजित पवार यांनी समजा आढावा घेतला तर बिघडले कुठे..? मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री गेले नाहीत. तिथल्या खुर्चीवर त्यांचे लावलेले नाव विधानसभा अध्यक्षांनी काढून तिथे अजित पवारांना बसविले. यात मुख्यमंत्र्यांचा काय दोष..? विधानसभा अध्यक्ष भाजपचे. त्यांनी मुद्दाम हे केले असे म्हणणे योग्य नाही. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून फक्त बुके घेतला आणि बराच वेळ अजित पवार यांच्याशी उभे राहून गप्पा मारल्या. तो व्हिडीओ तुमच्या लोकांनी व्हायरल करायची गरज होती का..? अमितभाई नसतील बोलले मुख्यमंत्र्यांशी..! पुण्यात आल्यामुळे त्यांना अजितदादांना काही विचारायचे असेल... म्हणून का तो व्हिडीओ व्हायरल करायचा..?

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. तिथे त्यांनी दिलीप वळसे पाटील यांना जवळ बसवून चर्चा केली. अगदी सुरुवातीला जशी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली होती तशी... यावेळी चित्र बदलले. आता अजितदादा सरकारमध्ये आहेत. कार्यक्रम संपून परत जाताना पंतप्रधानांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून स्माईल दिले. काहीतरी बोलले मात्र मुख्यमंत्र्यांना ते काहीच बोलले नाहीत... हा घटनाक्रम तुमच्या लोकांनी सगळ्यांना सांगायची काय गरज आहे..? मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान यांची दिल्लीत वेळ मागितली होती. तेव्हा पंतप्रधानांनी संपूर्ण कुटुंबाला बोलावून ती भेट कौटुंबिक करून टाकली. तुम्हा काँग्रेसवाल्यांना तेही पाहवत नाही. राजकीय बोलणे टाळण्यासाठी कुटुंबाला बोलावले, असे तुमचे प्रवक्ते सांगत होते. हे योग्य नाही..? या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला तिघे आवर्जून जातात. ते तुम्हा काँग्रेसवाल्यांना पाहवत नाही. मुख्यमंत्र्यांना एकट्याला कार्यक्रम करता येत नाही. त्यांना या दोघांना सोबत न्यावे लागते, असे तुमच्या कार्यकर्त्यांचे बोलणे योग्य नव्हे...

रामदास कदम यांचे चिरंजीव आक्रमक आहेत. त्यामुळे मुंबईत ४० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे राजीनामे दिले. हा विषय मुख्यमंत्री स्वत: हाताळत आहेत. मात्र त्यावरूनही टीका करणे, शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने धमकी दिली. तो फरार आहे, यावरून राजकारण करणे, शिंदे गटातील संतोष बांगर, संजय गायकवाड, अब्दुल सत्तार, किशोर पाटील या आमदारांनी पत्रकार, अधिकारी, ग्रामस्थ यांना मारणे, शिवीगाळ करणे, आ. सदा सरवणकर यांनी गोळीबार करणे ... ही अशीच कामं शिंदे गटाची आहेत का..? नानाभाऊ,  काही चांगल्या गोष्टीही बघत जा... त्या सापडल्या तर जनतेलाही सांगत जा... म्हणजे तुम्ही खरे विरोधी पक्षाचे प्रतिनिधी आहात, हे लोकांना कळेल. 

मध्यंतरी एक सर्व्हे आला होता. त्यात, शिंदे गटाला सर्वाधिक जागा मिळणार, देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे गट पुढे जाणार... असे म्हटले होते. त्या सर्वेक्षणाची आता आठवण करून देऊ नका. सगळेजण तो विषय विसरून गेले आहेत. शिंदे गटाचे दहा ते बारा आमदार निवडून आले तरी खूप... असे आता म्हणू नका. उगाच त्यामुळे मतदारसंघात अडचणी निर्माण होतात. निवडणुका होतील तेव्हा या विषयावर बोला. आधी लोकसभा पार पडू द्या... नंतर कोण, कोणासोबत, कसे जाईल हे सांगायला सगळ्या भविष्यकारांनी आधीच नकार दिला आहे, हे लक्षात ठेवा. असो गंमत- जंमत सांगायला तुमच्या पक्षात खूप विषय आहेत. ते सांगा.

तुमचाच, बाबूराव

 

Web Title: political consequences after nana patole criticized shinde govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.