मराठा आरक्षणाविरोधात राजकीय षड्यंत्र; अशोक चव्हाण यांचा भाजपवर थेट आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 07:50 AM2020-08-11T07:50:52+5:302020-08-11T07:51:20+5:30
आंदोलने भाजप पुरस्कृत असल्याचा थेट आरोप
मुंबई : मराठा आरक्षण कायम राहू नये, यासाठी मोठे राजकीय षड्यंत्र सुरू आहे. राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत. यावरून झालेल्या आंदोलनांचा बोलविता धनी वेगळा असून, ही आंदोलने भाजप पुरस्कृत असल्याचा थेट आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या तयारीबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन भक्कम तयारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू यशस्वीपणे मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनाच सर्वोच्च न्यायालयात कायम ठेवले आहे. त्यांच्यासमवेत शासनाच्या वतीने परमजीतसिंग पटवालिया बाजू मांडतील. हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, रफिक दादा, विजयसिंह थोरात अशी दिग्गज मंडळी मराठा आरक्षणाची बाजू लावून धरतील.
सुनावणी आॅनलाइनऐवजी प्रत्यक्ष व्हावी, अशी भूमिका राज्य सरकारने यापूर्वीच मांडली आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवावे, या मागणीसाठी येत्या २५ आॅगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.
ही वस्तुस्थिती असताना आता मराठा आरक्षणाच्या विरोधात छुप्या कारवाया सुरू झाल्या असून, त्यामुळेच राज्य सरकारवर जाणीवपूर्वक बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मराठा आरक्षण लागू होऊ नये, असा हेतू असलेल्या मंडळींचे हे कारस्थान असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.