राजकीय भूकंप : लातूरच्या महापौर, उपमहापौर, सभापतींचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 10:04 PM2018-11-25T22:04:00+5:302018-11-25T22:04:05+5:30
लातूर शहर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपात गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत गटबाजीमुळे धूसफूस सुरू होती.
लातूर - लातूर शहर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपात गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत गटबाजीमुळे धूसफूस सुरू होती. अखेर महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समितीचे सभापती अॅड. शैलेश गोजमगुंडे यांचे पक्षाने राजीनामे घेतले आहेत. याशिवाय, तीन स्वीकृत व स्थायी समितीच्या सदस्यांचेही राजीनामे उद्यापर्यंत घेतले जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, आठ दिवसांत नव्या पदाधिकाºयांच्या निवडी होणार असल्याच्या चर्चेला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी रविवारी दुजोरा दिला.
लातूर मनपात वर्षभरापासून सत्ताधा-यांमध्ये ताळमेळ नव्हता. अनेकदा सभागृहातही सदस्यांमध्ये एकमत होत नव्हते. मनपाची सर्वसाधारण सभा असो की स्थायीची बैठक असो, महापौर, स्थायी समितीचे सभापती विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना अनेकदा एकाकी पडत होते. यावरूनच सत्ताधाºयांमध्ये काही तरी धूसफूस सुरू असल्याचे जाणवत होते. काही महिन्यांपूर्वी महापौरांनी बोलाविलेल्या सर्वसाधारण सभेला सत्ताधारी सदस्यच अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांना तांत्रिक कारण सांगून सभा रद्द करावी लागली होती. लातूर मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली होती. शिवाय, परवा झालेल्या सर्वसाधारण सभेतही महापौरांवर विरोधकांनी भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. त्यावेळीही त्यांच्या मदतीला सत्ताधारी सदस्य धावले नाहीत. अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाने राजीनामे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापौर सुरेश पवार मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपात आले होते. त्यांच्या निवडीला भाजपाच्या निष्ठावंतांचा विरोध होता. हा विरोध डावलून पक्षाने त्यांना महापौर केले होते. भाजपात दोन गट झाल्याने विरोधकांनी सभागृहात अनेकदा महापौरांना कोंडीत पकडले. त्यांना निष्क्रिय ठरविण्यासाठी अंतर्गत गटबाजी भोवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पक्षाच्या आदेशानुसार राजीनामे : शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी
महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी रविवारी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत. त्यांना पक्षाकडून तसे आदेश होते. उद्यापर्यंत स्वीकृत तीन सदस्य व स्थायी समितीचे सदस्य पक्षादेशानुसार राजीनामे देतील, असे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झाली बैठक...
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे रविवारी लातुरात होते. त्यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीला मनपाचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या चार दिवसांपासून राजीनामे घ्यायचे, या विषयावर पक्षांतर्गत खलबते सुरू होते. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार राजीनामा घेण्याचा निर्णय झाल्याने पदाधिकाºयांनी राजीनामे दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.