हरकतींमध्ये राजकीय समीकरणेच

By admin | Published: November 5, 2016 12:31 AM2016-11-05T00:31:31+5:302016-11-05T00:31:31+5:30

हरकतींमधून राजकीय गणिते जुळविण्याचाच प्रयत्न राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

Political equations in objections | हरकतींमध्ये राजकीय समीकरणेच

हरकतींमध्ये राजकीय समीकरणेच

Next


पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या ४ सदस्यीय प्रारूप प्रभागरचनेबाबत नोंदविण्यात आलेल्या हरकतींमधून राजकीय गणिते जुळविण्याचाच प्रयत्न राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचे चित्र दिसून आले. त्याचबरोबर काही नैसर्गिक सीमा डावलल्याचे गंभीर आक्षेपही यानिमित्ताने समोर आले.
राज्य निवडणूक आयोगाने पुण्याच्या प्रभागरचनेची सुनावणी घेण्यासाठी नियुक्त केलेल्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या पॅनलकडून नागरिकांच्या हरकती ऐकून घेतल्या. या समितीमध्ये महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिकेचे निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांचा समावेश होता. महापालिकडे एकूण ११०२ हरकती नोंदविण्यात आल्या. त्याची छाननी केली असता एकच तक्रार अनेकांनी केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार प्रभागरचनेवर एकूण १३३ आक्षेप असल्याचे स्पष्ट झाले. प्रभागरचनेच्या हद्दींबाबत सर्वाधिक हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापाठोपाठ प्रभागांची नावे, आरक्षणे याबाबत हरकती आल्या. काही गमतीशीर हरकतीही नोंदविल्या आल्या.
बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रभागनिहाय सुनावणी घेण्यास सुरूवात करण्यात आली. हरकतदारांना पालिकेकडून क्रमांक देण्यात आले होते. त्या क्रमांकानुसार त्यांना समोर बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. एलईडी स्क्रिनवर प्रभागाचा नकाशा लावण्यात आला होता. त्या नकाशासमोर जाऊन त्याबाबत काय आक्षेप आहेत ते सांगण्यात हरकतदारांना सांगितले जात होते.
आपला मतदार असलेला विशिष्ट भाग दुसऱ्या प्रभागाला जोडला आहे, तो आपल्या प्रभागाला जोडला जावा या हेतूने राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी अनेक हरकती नोंदविल्या असल्याचे दिसून आले. आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने हा भाग आपल्या प्रभागात जोडावा अशी हरकत नोंदविल्याची माहिती मिळाल्याने तसा बदल केला जाऊ नये अशीही हरकत नोंदविण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ४ सदस्यीय प्रभाग झाल्याने मतांची गणिते जुळविण्यासाठी इच्छुकांकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रभागात आपल्याला हवा तसा बदल व्हावा यासाठी शेवटचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करून पाहिला.
नैसर्गिक सीमा ओलांडून प्रभागरचना करण्यात आल्याबद्दलही अनेक आक्षेप नोंदविण्यात आले. नदी, मुख्य रस्ते यांची सीमा पाळली गेली नाही अशा अनेक हरकती घेण्यात आल्या. आरक्षणांबाबतही अनेक आक्षेप घेण्यात आले. गोखलेनगर येथील प्रभाग पंख्याच्या आकाराचा केला असल्याबाबत हरकत घेण्यात आली.
>अंतिम प्रभागरचना २५ नोव्हेंबरला
निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी सीताराम कुंटे यांनी प्रभागरचनेवरील सर्व हरकती ऐकून घेतल्यानंतर त्यावर त्यांचा अभिप्राय नोंदवून १९ नोव्हेंबरपूर्वी ते राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत.
त्यानंतर निवडणूक आयोगाकडून हरकती मान्य अथवा अमान्य करून त्यानुसार प्रभागरचनेमध्ये बदल केले जातील. त्यानंतर अंतिम प्रभागररचना येत्या २५ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.
>सर्व उमेदवारांना
एकच चिन्ह द्या
अनेक किस्से आणि पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांकडून काही गमतीदार हरकतीही नोंदविण्यात आल्या. एका पुणेकराने सर्व उमेदवारांना एकच चिन्ह द्या म्हणजे निवडून आल्यावर ते एकदिलाने काम करतील, अशी सूचना केली. विशेष म्हणजे त्यांनाही सुनावणीसाठी निमंत्रण पाठवून पॅनलकडून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. गणपतीचे मंदिर दुसऱ्या प्रभागात
गेले आहे, ते मंदिर आमच्या प्रभागात यावे अशीही एक हरकत नोंदविण्यात आली.
>क्षेत्रीय कार्यालय
नंतर जाहीर करणार
महापालिकेच्या ४ सदस्यीय प्रभाग १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी कोणत्या कार्यालयाला जोडले जाणार आहेत याबाबत अनेक शंका घेण्यात आल्या होत्या. मात्र ही प्रारूप प्रभागरचना आहे, अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर ते कोणत्या क्षेत्रीय कार्यालयाला जोडणार ते जाहीर केले जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Political equations in objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.