अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राजकीय कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 03:23 PM2018-04-29T15:23:38+5:302018-04-29T15:23:38+5:30

जयंत पाटील यांच्याकडे आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे

political journey of ncp leader jayant patil who is elected as a state president | अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राजकीय कारकीर्द

अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राजकीय कारकीर्द

googlenewsNext

सांगली : कृष्णा आणि वारणा नदीच्या सुपीक पट्ट्यात वसलेला सधन आणि क्रांतीकारकांचा तालुका म्हणून वाळव्याची ओळख आहे. पूर्वीचा वाळवा विधानसभा मतदारसंघ हा २००९ च्या पुनर्रचनेनंतर इस्लामपूर या नावाने पुढे आला. पुनर्रचनेनंतर वाळवा तालुक्यातील ३८ आणि मिरज तालुक्यातील आठ गावं अशा एकूण ४६ गावांचा समावेश असणारा आणि वाळवा-मिरज अशा दोन तालुक्यात इस्लामपूर मतदारसंघाची विभागणी झाली आहे. विशेष म्हणजे पुनर्रचनेत वाळवा तालुक्यातील ५२ गावे पश्चिमेकडील शिराळा मतदारसंघात गेली आहेत. त्यामुळे तालुक्याची विभागणी इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात झाली आहे. १९६२ पासूनच्या निवडणुकीत राजारामबापू पाटील तीन वेळा व जयंत पाटील सहावेळा यांच्या रूपाने साखराळे गावाच्या नावावर नऊवेळा आमदारकीची मोहोर लागली. विरोधकांना नामोहरम करण्यात प्रत्येकवेळी जयंत पाटील यशस्वी ठरले आणि म्हणूनच सलग सहा विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला.

क्रांतीकारकांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या या तालुक्यात राजारामबापू पाटील यांनी सहकाराची बिजे रोवली. जयंत पाटलांच्या संघनटकौशल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मजबूत बालेकिल्ला बनला आहे. साखर कारखाने, सहकारी दूध संघ, सहकारी बँक, सहकारी वस्त्रोद्योग संकुल, सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प, कासेगाव शिक्षण संस्था या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्वच क्षेत्रावर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचं वर्चस्व अबाधित ठेवलं आहे. याच माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचं भक्कम नेटवर्क तयार केलं आहे. 

मंत्रिमंडळातील पद व कार्यकाळ
– विधानसभा सदस्य (1990, 1995, 1999, 2004 ,2009 आणि 2014 )
– अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य (1999-2008)
– गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य (2008-2009)
– ग्रामविकासमंत्री, महाराष्ट्र राज्य (2009-2014).

जयंत पाटील हे पश्र्चिम महाराष्ट्रातील दिवंगत नेते राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव. राजारामबापूंनी वाळव्यात समाजाभिमुख साम्राज्य उभारले. सहकारी साखर कारखान्यापासून शिक्षणसंस्था, सहकारी बँका, पतपेढ्या असं विकाससंस्थांचे जाळं उभारलं आणि परिसरात क्रांती घडवून आणली. वसंतदादांनी सांगलीचा, यशवंतराव चव्हाण यांनी कराडचा, शंकरराव मोहिते पाटलांनी अकलूजचा विकास केला, तसा ७० ते ८०च्या दशकात राजारामबापूंनी वाळव्याचा विकास केला. राजारामबापू पाटलांचा समाजसेवेचा वसा आणि राजकारणाचा वारसा जयंतरावांना मिळाला आहे.
‘प्रोफेशनल’ लीडर्सच्या जमान्यात जयंतरावांसारखा ‘डिव्होशनल’ लीडर राजकारणात दिसतो याचे रहस्य वडिलांच्या शिकवणुकीत आहे. जयंतराव मितभाषी आहेत. गरजेपेक्षा अधिक ते बोलत नाहीत. आज महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा ज्या माजी मंत्र्यांच्या चरित्र आणि चारित्र्यामुळे उजळली आहे, त्यात जयंत पाटील यांचेसुद्धा नाव येते.

निष्कलंक चारित्र्य, वादातीत नेतृत्व आणि निर्विवाद कर्तृत्व हे जयंतरावांच्या प्रतिमेचे पैलू आहेत. गांभीर्य हा त्यांचा स्वभाव आहे. जयंत पाटील ‘सिरीयसली’ आणि ‘सिन्सीअरली’ सर्व विषय, मुद्दे हाताळतात हे त्यांचे तत्कालीन मंत्रिमंडळातील सहकारी आणि त्यांच्याशी संवाद असलेले ज्येष्ठ अधिकारीदेखील सांगतात.

सामान्यांतला सामान्य माणूस कुणाच्याही मध्यस्थीशिवाय आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय थेट जयंतरावांपर्यंत पोहोचू शकतो, दाद मागू शकतो. राष्ट्रवादीतल्या गटबाजीत ते जसे नाहीत, तसेच प्रशासनाच्या गटबाजीतदेखील नव्हते. बदल्या, बढत्यांमुळे बदनाम न झालेले गृहमंत्री म्हणून आर. आर. पाटील आबांसोबत जयंत पाटलांचेच नाव घ्यावे लागेल.

पाटील यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात सलग पंधरा वर्षें अर्थ, गृह व ग्रामविकासमंत्री म्हणून प्रभावी काम करतानाच लोकांचे विविध प्रश्न सोडविण्यास मोठे सहकार्य केले. त्यांच्या राजारामनगर, मुंबई येथील कार्यालयं, घरासमोर नेहमी लोकांची गर्दी होते. सध्या ते मंत्री नाहीत, तरीही लोकांचा त्यांच्याकडे येण्याचा ओघ काम आहे. यावरून त्यांच्या कार्याचा अंदाज येतो.

संयम, सहनशक्ती, सौजन्य, समंजसपणा याबरोबरच निर्धार, कणखरपणा, कर्तव्य, कठोरता हे सर्व गुण जयंत पाटील यांच्यात आहेत. हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्तानं राज्यभर फिरून त्यांनी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेची सर्वात मोठी सभा झाली हे विशेष.
 

Web Title: political journey of ncp leader jayant patil who is elected as a state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.