राजकीय वैमनस्यातून हत्या, चौघांची जन्मठेप कायम
By admin | Published: August 5, 2014 01:00 AM2014-08-05T01:00:28+5:302014-08-05T01:00:28+5:30
वर्धा जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून घडलेल्या थरारक हत्याकांडातील चार आरोपींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.
हायकोर्ट : वर्धा जिल्ह्यातील थरारक घटना
नागपूर : वर्धा जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून घडलेल्या थरारक हत्याकांडातील चार आरोपींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.
विजय ऊर्फ गुड्डू बाबाराव महाकाळकर (३४), विनोद जंगलू भाकरे (३४), देवानंद भरत महाकाळकर (३५) व शंकर गोविंद लांडगे (३५) अशी आरोपींची नावे आहेत. वर्धा सत्र न्यायालयाने या चारही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड, कलम १२०-ब अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड, तर कलम ३४१ अंतर्गत १ महिना कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तसेच, कलम १२०-ब अंतर्गतची शिक्षा भोगल्यानंतर अन्य कलमांतर्गतची शिक्षा एकाच वेळी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. सेवाग्राम पोलिसांनी एकूण १९ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयाने वरील चार आरोपी वगळता अन्य आरोपींना निर्दोष सोडले होते. अन्य आरोपींमध्ये राधेश्याम ओंकार महाकाळकर (२८), जंगलू गणपत भाकरे (५९), राजू बाबाराव महाकाळकर (२८), दिलीप पंढरी महाकाळकर (३०), संदीप यशवंत महाकाळकर (३२), सुरेश दौलत थोटे (५७), जानराव शंकर धांडे (४८), विलास नरसिंग महाकाळकर (४३), हृदयनाथ भाऊराव सोनटक्के (२६), नरसिंग विठोबा महाकाळकर (६७), विलास बाबुलाल पाहुणे (४३), यशवंत श्यामराव महाकाळकर (५२), भास्कर जंगलू भाकरे (५२), ज्ञानेश्वर उर्फ नाला नारायण काचोडे (४५) व रणजित वसंत शिंदे (४७) यांचा समावेश आहे. शेवटचे दोघे नालवाडी, तर इतर सर्व आरोपी महाकाळ (वर्धा) येथील रहिवासी आहेत. दोषी आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध, तर राज्य शासन व मृताची पत्नी अर्चना यांनी १५ आरोपींना निर्दोष सोडण्यात आल्यामुळे उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता तिन्ही अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
मृताचे नाव मकरंद टोंपे होते. खटल्यातील माहितीनुसार, महाकाळ गावात दोन राजकीय गट होते. टोंपे हे एका गटाचे नेतृत्व करीत होते. हा गट काही वर्षे सत्तेवरही होता. आरोपी दुसऱ्या गटाचे प्रतिनिधित्व करीत होते. शत्रुत्वामुळे दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतर ३१ आॅगस्ट २००७ रोजी सकाळी सातोडा गावातील शेतात टोंपे यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी त्याच दिवसी दोन प्रत्यक्ष साक्षीदारांचे बयान नोंदवून आरोपींना अटक केली होती. दोषी आरोपींविरुद्ध वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर, निर्दोष आरोपींतर्फे अॅड. राजेंद्र डागा, शासनातर्फे एपीपी डी. बी. पटेल, तर अर्चना टोंगेंतर्फे व्ही. आर. मुंदडा यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)