पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 11:46 AM2018-05-31T11:46:32+5:302018-05-31T15:03:44+5:30
महाराष्ट्र सरकारमधील कृषिमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे रात्री निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. रणजित पाटील, यांनी फुंडकर यांना श्रद्धांजली वाहिली.
मुंबई - महाराष्ट्र सरकारमधील कृषिमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे रात्री निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, डॉ. रणजित पाटील, यांनी फुंडकर यांना श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्रात भाजपाला वाढवण्यामध्ये फुंडकर यांचे मोठे योगदान - नरेंद्र मोदी
फुंडकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. महाराष्ट्रामध्ये भाजपाला वाढवण्यामध्ये त्यांचे योगदान मोठे होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठीही त्यांनी योगदान दिले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तेष्टांना या दु:खद प्रसंगातून सावरण्याची शक्ती मिळो.
Saddened by the demise of Maharashtra’s Agriculture Minister Shri Pandurang Fundkar. He made an invaluable contribution towards building the BJP in Maharashtra. He was also at the forefront of serving the farmers of the state. My thoughts are with his family and supporters.
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2018
एका ज्येष्ठ, सहृदयी आणि मातीशी नाळ असलेला नेता हरपला - शरद पवार
पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. विदर्भातील एका ज्येष्ठ आणि सहृदयी, मातीशी नाळ असलेल्या नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. जनतेने त्यांना सलग तीन वेळा संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली यावरून त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते. अतिशय मनमिळावू आणि मृदू स्वभावाचे फुंडकर यांनी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना जनतेच्या प्रश्नांवरून कणखर विरोधकाची भूमिकादेखील पार पाडली. महाराष्ट्राच्या राजकीय आणि समाजिक क्षेत्रात त्यांची पोकळी सतत जाणवत राहील. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहबागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
शेती आणि सहकारातील प्रश्नांची जाण असलेला नेता गमावला - देवेंद्र फडणवीस
आमचे ज्येष्ठ नेते, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, राज्याचे कृषिमंत्री श्री भाऊसाहेब फुंडकर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकाऱ्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे. शेती आणि सहकारातील प्रश्नांची जाण असलेला नेता आपण गमावला आहे. विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भाऊसाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी, सहकार व ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! - अशोक चव्हाण
संवेदनशील व अनुभवी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड - विखे पाटील
राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब उपाख्य पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे एक संयमी, संवेदनशील व अनुभवी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून समोर येत त्यांनी राजकारणात मोठे काम केले. आमदार, खासदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे मंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. राजकारणात मिळालेल्या प्रत्येक संधीला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. ते राज्यातील एक मोठे नेते होते. मात्र त्यांचा वावर नेहमी एखाद्या कार्यकर्त्यासारखा असायचा.
छञ हरपले.! - डॉ. रणजित पाटील
आज सकाळी आपल्या राज्याचे कृषीमंञी पांडुरंगजी फुंडकर साहेबांच्या निधनाचे वृत्त खरे आहे कळाल्यावर शरीरातील चेतना निघून गेल्यासारखे वाटते आहे. आदरणीय भाऊसाहेब म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्न, समस्या, व्यथा जाणणारा आणि त्या सोडविण्यासाठी सर्व शक्ती एकवटून लढणारा नेता मग सत्तेत असो वा विरोधात. जमिनीवर पाय असलेला हा आकाशाच्या उंचीचा नेता!लढवय्या, अभ्यासु, संवेदनशील,आणि विरोधकांनाही भावणारा नेता,असा विकासपुरुष काळाने हिरावून घेतला आणि विदर्भाला पोरके केले.
शेतकरी आणि सर्वसामान्यांचा नेता हरपला- सुधीर मुनगंटीवार
शांत संयमी आणि सर्वमान्य नेता असा ज्यांचा परिचय आहे, ज्याची सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी थेट नाळ जुळली आहे असा शेतकरी नेता, सर्वसामान्यांचा नेता आज भाऊसाहेब अर्थात पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने आमच्यातून गेला आहे. त्यांच्या निधनाने ना केवळ त्यांच्या कुटुंबाचे परंतू भारतीय जनता पक्षाची ही अपरिमित हानी झाली आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो.
शेतकऱ्यांचा जाणता राजा हरपला - जयकुमार रावल
राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब यांचे सतत मला मार्गदर्शन लाभत होते, त्यांनी आणि मी सोबतच मंत्री पदाची शपथ घेतली होती , अभ्यासु आणि शेतकऱ्यांची जाण असलेल्या भाऊसाहेबाना राज्याचे कृषिमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली होती, त्यांनी ज्याच्या कामकाज ती चुणूक दाखविली होती, स्व मुंडे साहेब यांच्या टीममध्ये आम्ही सोबत काम केले होते त्यांच्या जाण्याने कधीही भरून निघणार नाही असे पक्षाचे नुकसान झाले आहे, मी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.
शेतीच्या प्रश्नांची जाण असलेले ग्रामीण भागातील नेतृत्व हरपले - छगन भुजबळ
राज्याच्या कृषी मंत्री पदाची धुरा संभाळणारे पांडुरंग फुंडकर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने अचानकपणे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. महाराष्ट्रात भाजपा पक्ष वाढवण्यासाठी पांडुरंग फुंडकर यांचं मोठं योगदान आहे. स्व.गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भाजपचा प्रचार आणि प्रसार केला.
एकनाथ खडसे यांनी वाहिली श्रद्धांजली